
“दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केडीएमसीचे हे एक छोटे पाऊल” — आयुक्त अभिनव गोयल
कल्याण-डोंबिवली | १ ऑक्टोबर :
महाराष्ट्राच्या अनेक भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा संकटात असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) सामाजिक संवेदनशीलता दाखवत यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च टाळून २५ लाख रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात येणार असल्याची माहिती महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (KDMC Cancels Anniversary Celebration, Donates ₹25 Lakh to CM Relief Fund for Drought-Affected People)
दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिरात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी खर्च होणाऱ्या रकमेत आणखी भर घालून २५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात येणार आहे. याला केडीएमसीतील सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. दुष्काळग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असल्याची प्रतिक्रिया महापौर हर्षाली थविल-चौधरी यांनी दिली आहे.
“दुष्काळग्रस्तांसाठी केडीएमसीचे एक छोटे पाऊल”
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करताना, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी केडीएमसीने उचललेले हे एक छोटे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली.
तसेच, वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिकेतील वर्ग ४ मधील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या स्वरूपातील उत्सव आणि अनावश्यक खर्च टाळून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याला यंदा प्राधान्य देण्यात आले आहे.
केडीएमसीच्या सत्ताधारी आणि प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून संकटाच्या काळात उत्सवापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्याचा संदेश या निर्णयातून मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या पत्रकार परिषदेला उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, सभागृह नेते वरुण पाटील, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका जाधव, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह इतर पालिका सदस्य, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी आणि महापालिका सचिव किशोर शेळके उपस्थित होते.

























