Site icon LNN

केडीएमसीची पहिली महासभा; ज्येष्ठ सदस्यांसोबत नव्या लोकप्रतिनिधींकडूनही प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार

नगरसेवक पदाची शपथ देण्यासह सभागृह नेता, स्थायी, महिला – बालकल्याण आणि शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती

कल्याण डोंबिवली दि.17 मार्च :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पहिली वाहिली महासभा सोमवारी दणक्यात संपन्न झाली. महासभेचा पोलीस बंदोबस्त आणि लोकप्रतिनिधींची तपासणी, रस्तेदुरुस्ती, नालेसफाई, पाणी पुरवठा, करवाढ, भटके कुत्रे आदी प्रश्नांवरून ज्येष्ठ सदस्यांसोबतच नव्या लोकप्रतिनिधींनीही प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केल्याचे दिसून आले. तर यापूर्वी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना नगरसेवकपदाची शपथ देण्यासह सभागृह नेता, स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्तीही घोषित करण्यात आली. (KDMC’s First General Body Meeting; New Representatives Join Senior Members in Firing a Barrage of Questions at the Administration)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतरची आणि नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच महासभा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर पहिल्याच महासभेला असणारा तगडा पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांकडून नगरसेवक, नगरसेविकांची झालेल्या तपासणीचा मुद्दा शिवसेना नगरसेवक सचिन पोटे यांनी उपस्थित केला. ज्यावरून सभागृहातील इतर ज्येष्ठ तसेच नव्या लोकप्रतिनिधींनी त्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, अशाप्रकारे आमची तपासणी व्हायला आम्ही कोणी अतिरेकी आहोत का?” अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी आपली नाराजी व्यक्त केली.

सभागृह नेता, स्थायी समितीसह इतर सदस्यांची नियुक्ती…
पोलिस बंदोबस्त आणि तपासणीचा मुद्दा शांत झाल्यावर मग सभागृहात महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी यांच्याकडून सभागृह नेतेपदी भाजप नगरसेवक वरुण पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मग स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितच्या सदस्यांच्या नावाची घोषणा झाली.

स्थायी समितीमध्ये यांची लागली वर्णी..
केडीएमसीच्या स्थायी समिती सदस्यांमध्ये शिवसेना मनसे राष्ट्रवादी या शिवआघाडीचे 8 सदस्य, भाजपाचे 7 सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेकडून गजानन पाटील, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे, महेश गायकवाड आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांचा समावेश आहे. भाजपकडून दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे आणि उपेक्षा भोईर यांची तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक विशाल गारवे यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

महिला आणि बाल कल्याणपदी हे सदस्य…
केडीएमसीच्या महिला बालकल्याण आणि शिक्षण मंडळ समिती या समितीच्या 11 सदस्यांमध्ये शिवसेना मनसे राष्ट्रवादी शिव आघाडीचे 5 सदस्य, भाजपाचे 5 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना मनसे राष्ट्रवादी शिवआघाडीमध्ये रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेच्या रसिका पाटील, भाजपाच्या मेघाली खेमा, डॉ. पूजा गायकवाड, सरोज राय, सुनीता पाटील, रविना माळी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या तेजस्वी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

शिक्षण मंडळ समितीमध्ये आहे हे सदस्य…
तर शिक्षण मंडळ समितीमध्ये शिवसेनेचे प्रतीक पेणकर, अनघा देवळेकर, शालिनी वायले, दिपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपचे अभिजित थरवळ, जतिन प्रजापती, ॲड.कविता म्हात्रे, शामल गायकर, रसिका कृष्णा पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अपर्णा भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सदस्यांच्या निवडीनंतर आता सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version