
कल्याण पश्चिमेतील बूथ क्रमांक 100 वर थेट प्रक्षेपणाचे आयोजन
कल्याण, दि. २२ फेब्रुवारी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय संवाद कार्यक्रमाच्या १३१ व्या भागाचे थेट प्रक्षेपण कल्याण पश्चिमेतील सहकार मंदिर हॉल (आग्रा रोड) येथे बूथ क्रमांक १०० वर उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. (Mann Ki Baat’ is Not Just a Program, But an Inspiration for Nation Building – BJP Corporator Hemlata Pawar)
या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘AI इम्पॅक्ट समिट’मधील यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रकल्प, टी-२० वर्ल्ड कपमध्ये झळकणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंचे योगदान, तसेच अवयवदानाचा आदर्श ठेवणाऱ्या एका चिमुकलीची प्रेरणादायी कथा यांसारख्या विविध विषयांवर भाष्य केले. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील KYC प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. विशेषतः अवयवदानासारख्या संवेदनशील विषयावर बोलताना समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनकरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेचाही संदेश दिला.
तर मन की बात’ हा आता केवळ एक कार्यक्रम राहिला नसून तो राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा बनला आहे. या माध्यमातून प्रत्येक नागरिकामध्ये सकारात्मक विचारांची दिशा निर्माण होते आणि देशहितासाठी योगदान देण्याची जाणीव होत असल्याची भावना भाजपा नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी या कार्यक्रमानंतर व्यक्त केली. तसेच अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारसरणी बळकट होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधान मोदी यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी देशाच्या विविध घडामोडींवर आधारित पंतप्रधानांचा संवाद एकाग्रतेने ऐकला.
कार्यकर्ता टिफीन बैठकीचे”ही आयोजन …
दरम्यान या मन की बात कार्यक्रम प्रक्षेपणानंतर त्याच ठिकाणी भाजपच्या “कार्यकर्ता टिफीन बैठकीचे”ही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी विकासकामांचा तसेच कल्याणकारी योजनांवर चर्चाही करण्यात आली. तसेच ही सर्व विकासकामे आणि योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले.
























