Home ठळक बातम्या गझल,शायरी-सुरेल संगीताची ‘मेहफिल-ए-बैठक’; इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या समाजसेवेचा आगळा वेगळा सूर

गझल,शायरी-सुरेल संगीताची ‘मेहफिल-ए-बैठक’; इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या समाजसेवेचा आगळा वेगळा सूर

जव्हारमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी निधी संकलन

कल्याण | २९ जून :
इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहफिल-ए-बैठक’ या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गझल, शायरी आणि मधुर गीतांच्या सुरेल सादरीकरणाने रंगलेल्या या कार्यक्रमातून केवळ मनोरंजनच नव्हे, तर समाजसेवेचा संदेशही देण्यात आला. या कार्यक्रमातून जमा झालेला निधी जव्हारच्या जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक- मूलभूत सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या अध्यक्षा डॉ. तृप्ती बोबडे यांनी दिली. (‘Mehfil-e-Baithak’ Blends Ghazals, Shayari and Soulful Music with a Noble Cause; Inner Wheel Club of Kalyan Diamonds Strikes a Unique Note in Social Service)

हा उपक्रम विशेषतः “युवकांसाठी, युवकांनी साकारलेला” होता. आजची तरुणाई ही समाज आणि देशाचे भविष्य असून त्यांच्या मनात कला, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचार रुजविण्याचा हा प्रयत्न आहे. संगीताच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडत सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मैफिलीत युवा कलाकारांनी सादर केलेल्या अवीट गोडीची गाणी, गझल आणि शायरीना उपस्थित दर्दी प्रेक्षकांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिल्याचे दिसून आले. तर एकीकडे आचार्य अत्रे रंगमंदिरातील शब्दसुरांची जशी बरसात सुरू झाली त्यापाठोपाठ बाहेर पावसाच्या जलधारांनीही ठेका धरल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमाच्या या माध्यमातून जमा झालेला निधी जव्हार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वीही इनर व्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सने ‘व्हॉईस ऑफ कल्याण’ या प्रकल्पांतर्गत संबंधित शाळेला संगणक आणि प्रिंटर भेट देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना दिली होती.

यावेळी आयोजकांकडून ‘मेहफिल-ए-बैठक’ कार्यक्रमातील सर्व कलाकार, आयोजन समिती, स्वयंसेवक, देणगीदार, हितचिंतक तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व मान्यवर अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच इनर व्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या सचिव अस्मिता वेखंडे,प्रोजेक्ट चेअरमन प्रतिभा गटकळ, मनिषा आव्हाड, ताजिंदर कौर, योगिनी कोसराबे, सरला एरंडे, स्मृती अग्निहोत्री, हर्षदा सावंत यांच्यासह सर्व सदस्यांनी केलेल्या अथक परिश्रम आणि उत्कृष्ट टीमवर्कमुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे डॉ. तृप्ती बोबडे यांनी सांगितले.

सुरेल गझल, शायरी आणि मधुर गीतांच्या मैफलीने सजलेल्या या कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी कलाकारांना भरभरून दाद दिली. संगीताच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याला हातभार लावणारा हा उपक्रम कल्याण शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा