
कल्याण | ४ नोव्हेंबर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील व्यापारी, दुकानदार आणि शोरूम चालकांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व्यापारी सेलचे कल्याण शहराध्यक्ष विमल ठक्कर (वसाणी) यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले. दिवाळीच्या खरेदीच्या काळात व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी सहकार्य करावे आणि विनाकारण दुकान बंद करण्यासाठी दबाव आणू नये, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तर डी सी पी अतुल झेंडे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेत यापुढे अशा प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे संबंधितांना निर्देश दिले. (No Unnecessary Harassment of Traders During Diwali: Shiv Sena Vyapari Cell President Vimal Thakkar Meets Kalyan DCP.)
सध्या ऑनलाइन खरेदीचा वाढता प्रभाव आणि आर्थिक मंदीमुळे पारंपरिक दुकान व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा सण व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा व्यावसायिक हंगाम असतो. कल्याणमधील अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईला जात असल्याने ते रात्री उशिरा घरी परततात. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी प्रामुख्याने रात्री ८.३० नंतर दुकानांमध्ये होत असल्याचे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
ग्राहकांची खरेदी पूर्ण झाल्यानंतर दुकानातील मालाची आवराआवर, स्टॉकची मांडणी, हिशोब आणि बिलांची पूर्तता करून दुकान बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना आणखी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र, या दरम्यान पोलीस कर्मचारी आणि बीट मार्शल यांच्याकडून दुकान बंद करण्याबाबत दबाव आणला जात असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार विमल ठक्कर यांनी केली.
दिवाळीच्या शेवटच्या आठवड्यात ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी पुरेसा वेळ आणि सहकार्य मिळावे. तसेच दुकानांचे नियमित कामकाज सुरू असताना विनाकारण हस्तक्षेप किंवा त्रास दिला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली.
व्यापाऱ्यांच्या अडचणींची दखल घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. यापुढे व्यापाऱ्यांना अशा प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतील, तसेच व्यापाऱ्यांची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्यान शोरूम मालक भरत मोटा यांच्यासह अन्य व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण वातावरणात व्यवसाय करता यावा, तसेच ग्राहकांनाही खरेदीसाठी सुलभ वातावरण मिळावे, या उद्देशाने ही भेट घेण्यात आल्याचे विमल ठक्कर यांनी स्पष्ट केले.























