रत्नागिरीत ३८.७°C तापमानाची नोंद; डोंबिवली-पनवेलमध्ये ३९.३°C, तर अंबरनाथमध्ये पारा ३९.४°C वर
कल्याण डोंबिवली | ९ ऑक्टोबर
ऑक्टोबर महिन्यात पावसाऐवजी उन्हाचा कडाका अनुभवायला मिळत असून कोकणासह मुंबई महानगर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. कल्याणमध्ये कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून डोंबिवलीत ३९.३°C, अंबरनाथमध्ये ३९.४°C आणि पनवेलमध्येही ३९.३°C तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सोशल दिली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. (October Heatwave Intensifies! Kalyan-Dombivli Mercury Hits 39°C; Konkan Records New Temperature Highs)
कोकणातील उष्णतेची तीव्रता अधोरेखित करताना रत्नागिरीत ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे मोडक यांनी नमूद केले आहे. त्यांच्या पोस्टनुसार, हे तापमान रत्नागिरीतील ऑक्टोबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान ठरल्याचेही मोडक यांनी सांगितले. विशेष म्हणजे, २ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरीत ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी २० ऑक्टोबर १९७७ रोजी नोंदवण्यात आलेला ३७.५ अंश सेल्सिअसचा जुना विक्रम मोडला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीसह अनेक शहरांत पारा चढला
८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या कमाल तापमानाच्या आकडेवारीनुसार, विविध शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले तापमान पुढीलप्रमाणे :
कल्याण : ३९°C
डोंबिवली: ३९.३°C
* अंबरनाथ : ३९.४°C
* पनवेल : ३९.३°C
* भातसानगर : ३९.२°C
* देवनार : ३९.१°C
* चिपळूण : ३९°C
* मुलुंड : ३८.८°C
* बदलापूर : ३८.८°C
* कर्जत : ३८.७°C
* कोपरखैरणे आणि विरार : ३८.६°C
* नवी मुंबई विमानतळ : ३८.५°C
* ठाणे आणि ऐरोली : ३८.५°C
* मोर्बे धरण परिसर : ३८.४°C
* बेलापूर आणि दिवा : ३८.३°C
* सुकसाळे आणि बिरवाडी : ४०°C
या आकडेवारीनुसार, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे.
पाऊस लवकर माघारी, कोरडे हवामान आणि समुद्री वाऱ्यांचा उशिरा प्रभाव तापमानातील या वाढीमागे मान्सूनचे लवकर माघार घेणे, कोरडे हवामान, समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे उशिरा आगमन आणि पूर्वेकडून वाहणारे वारे ही संभाव्य कारणे असल्याचे मोडक यांनी नमूद केले आहे. सामान्यतः समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किनारपट्टी आणि मुंबई महानगर प्रदेशातील तापमानाला काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र, या वाऱ्यांचा प्रभाव उशिरा जाणवत असल्यास आणि वातावरण कोरडे राहिल्यास तापमानात वाढ होऊ शकते.
नागरिकांनी उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन
ऑक्टोबर महिन्यातही तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे, हलके कपडे वापरावेत आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

