Home ठळक बातम्या कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या स्पर्धांना ठाणे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ हजार विद्यार्थ्यांचा...

कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या स्पर्धांना ठाणे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

कल्याण दि.1 मार्च :
कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण, हस्ताक्षर, एकपात्री अभिनय आणि समूह गायन स्पर्धांना यंदा ठाणे जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. (Overwhelming Response from Thane District to Balak Mandir School Competitions in Kalyan; 5,000 Students Participate)

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात आहे. यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष पूर्ण झाले असून, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अनेक शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच एकपात्री अभिनय आणि समूह गायन या दोन नवीन स्पर्धांचा समावेश करण्यात आला. या नव्या उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागी शाळांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल बालक मंदिर संस्थेचे कौतुक केले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण नुकताच कल्याण येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निखिल राणे (स्मायलिंग व्हिसलर), रंगकर्मी सुधीर चित्ते आणि संस्थेचे अध्यक्ष रमेश गोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांच्या कला शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

या संपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापिका कल्पना पवार यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून निशिगंधा आपटे, मीनल जोशी, मिलिंद खळदकर, सतीश देसाई, स्नेहा कुलकर्णी आणि दांडेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच भिका सोनजे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सीमा चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय भालचंद्र घाटे यांनी करून दिला. ईशस्तवन, स्वागतगीत कामिनी पाटील यांनी सादर केले. बक्षीस वाचन कामिनी पाटील, विद्या घुले, वैशाली शिंपी आणि सुबोध कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धा प्रमुख म्हणून भालचंद्र घाटे, प्रतिभा मोरे आणि विद्या घुले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची सांगता श्रीमती रेखा महिंद्रकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. तसेच सुबोध कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा