
कल्याण | २१ जून :
भारतीय संस्कृतीची सुमारे ५ हजार वर्षांची प्राचीन आणि अमूल्य देणगी असलेल्या योगविद्येचा जागतिक स्तरावर गौरव करणारा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.(Promoting Healthy Living Through Yoga: 12th International Yoga Day Celebrated with Enthusiasm at Kalyan Forest Range Office)
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि. २१ जून) वनपरिक्षेत्र अधिकारी, कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी, वनपाल आणि वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निमंत्रित योग प्रशिक्षक रामबरन यादव यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व, त्याचा शारीरिक,मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम तसेच दैनंदिन जीवनातील योगाचे स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मानसिक तणाव कमी करण्यासाठी, मनःशांती प्राप्त करण्यासाठी आणि मनोबल वाढविण्यासाठी योग कसा उपयुक्त ठरतो याबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी योग प्रशिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर उपस्थित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेण्यात आला. विविध योग प्रकारांमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते तसेच निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळते, असे मार्गदर्शनही करण्यात आले.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

























