
मार्केट रोडवरील वाहतूक व्यवस्थेसह फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर चर्चा
कल्याण डोंबिवली | ३ सप्टेंबर
आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध नागरी आणि प्रशासकीय प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना व्यापारी सेलचे कल्याण शहर अध्यक्ष विमल रमणिकलाल ठक्कर (वसाणी) यांनी महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी व्यापारी वर्गाच्या दैनंदिन अडचणी, वाहतूक कोंडीमुळे होणारे नुकसान तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. (Shiv Sena Traders’ Cell President Vimal Thakkar Discusses Key Issues of Kalyan-Dombivli Traders with KDMC Mayor)
दोन दिवसांवर गोकुळाष्टमीचा उत्सव असून तर दोन आठवड्यांनी गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी असे प्रमूख सण उत्सव पुढील दोन महिन्यांत साजरे होणार आहेत. त्यामूळे शहरातील वाढती वर्दळ आणि वाहनसंख्या पाहता कल्याण पश्चिमेच्या मार्केट रोडवरील एकमार्गी वाहतूक व्यवस्था बदलून दुतर्फा वाहतूक सुरू करण्याची मागणी ही या भेटीतील प्रमुख बाब ठरली. सध्याच्या एकमार्गी वाहतुकीमुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दुतर्फा वाहतूक सुरू केल्यास परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्यासोबतच बाजारपेठेतील व्यापारी व्यवहारांनाही चालना मिळेल, असे ठक्कर यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.
यासोबतच फेरीवाला परवाने देताना नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली. केडीएमसी हद्दीबाहेरील विविध भागांतून येऊन विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत अशा अनधिकृत व्यवसायांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय केडीएमसी क्षेत्रातील व्यापाऱ्यांशी संबंधित विविध नागरी, प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरही यावेळी त्यांनी महापौरांचे लक्ष वेधले. व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी प्रतिनिधींमध्ये नियमित समन्वय असणे आवश्यक असल्याचेही ठक्कर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विमल ठक्कर यांच्या या सर्व मागण्यांना महापौर ॲड. हर्षाली थविल- चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शक्य तितक्या लवकर त्यावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

व्यापारी वर्गाच्या प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर योग्य व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक बाजारपेठांच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

























