Home Uncategorised अखेर मान्सूनच्या पुनरागमनाची चिन्हे; २० जूननंतर पोषक वातावरण, मुंबई-ठाण्यात २४ ते २५...

अखेर मान्सूनच्या पुनरागमनाची चिन्हे; २० जूननंतर पोषक वातावरण, मुंबई-ठाण्यात २४ ते २५ जूनदरम्यान सक्रियतेची शक्यता

हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली सखोल माहिती

मुंबई | 17 जून :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची वाटचाल मंदावल्याचे चित्र असताना आता मान्सून पुनरुज्जीवनासाठी काही सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. हवामान मॉडेल्सनुसार जून महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत वातावरणीय परिस्थिती हळूहळू मान्सूनला अनुकूल होत जाण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केला आहे. (Signs of Monsoon Revival Finally Emerge; Favorable Conditions Expected After June 20, Mumbai-Thane Likely to See Active Rains Between June 24–25)

सध्या दबलेल्या स्थितीत असलेले मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) आगामी काळात फेज ७ मधून फेज १ मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता फारशी मजबूत नसली तरी त्यामधील हा बदल भारतीय उपखंडातील मान्सूनला नवसंजीवनी देण्यासाठी पुरेसा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र…
याच पार्श्वभूमीवर २५ जूनच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे देशात आर्द्रतेचा पुरवठा वाढून मान्सूनच्या वाऱ्यांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच २१ जूनपासून अरबी समुद्रातील सोमाली जेट अर्थात कमी उंचीवरील मान्सूनी वाऱ्यांचा वेग वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात आर्द्रता भारतीय किनारपट्टीकडे खेचली जाऊ शकते असे ते म्हणाले.

२१ जून ते ७ जुलैदरम्यान मान्सून सक्रिय होण्याची शक्यता…
या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून २१ जून ते ७ जुलैदरम्यान मान्सूनची नवी सक्रिय लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः केरळ, किनारी कर्नाटक आणि गोवा येथे पावसाची तीव्रता पुन्हा वाढू शकते. या भागांत मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता.

त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल उत्तर दिशेने सुरू होण्याची शक्यता असून दक्षिण कोकणात २२ ते २३ जूनदरम्यान तर उत्तर कोकण आणि मुंबई परिसरात २४ ते २५ जूनच्या सुमारास मान्सून अधिक स्थिर होण्याचे संकेत मोडक यांनी दिले आहेत.

मुंबईत २० जूनपासून तुरळक सरींची शक्यता…
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात २० ते २१ जूनपासून अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या वातावरणात असलेली कोरडी हवा हळूहळू कमी होऊन तिची जागा दमट मान्सूनी वारे घेतील. सुरुवातीला पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा राहू शकतो, मात्र २४ ते २५ जूनदरम्यान अधिक सातत्यपूर्ण मान्सूनी वातावरण तयार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

‘शेअर झोन’ ठरणार निर्णायक…
दरम्यान, आगामी काळात मान्सूनच्या पूर्व-पश्चिम शेअर झोन (East-West Shear Zone) ची स्थिती आणि स्थान हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास त्याच्याशी संबंधित हवेचे अभिसरण महाराष्ट्रावर प्रभाव टाकू शकते.

हा शेअर झोन सुमारे १९ अंश उत्तर अक्षांशावर स्थिरावल्यास त्याचा मुंबई, ठाणे, पालघर तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांवरील पावसावर मोठा परिणाम होऊ शकतो असा दिलासादायक अंदाजही मोडक यांनी वर्तवला आहे.

मात्र या शेअर झोनच्या अचूक स्थानानुसार दोन वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. एकतर उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो किंवा पावसाची मुख्य पट्टी दक्षिणेकडे सरकल्यास मुंबई आणि धरण क्षेत्रांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्यास काही दिवस विलंब होऊ शकतो.

मराठवाड्यासाठी दिलासादायक संकेत…
दुसरीकडे, कमी दाबाची प्रणाली मराठवाड्याकडे सरकल्यास या भागाला चांगल्या पावसाचा लाभ मिळू शकतो. विशेषतः २५ ते २७ जूनदरम्यान राज्याच्या अंतर्गत भागात समाधानकारक पावसाची शक्यता हवामान मॉडेल्स दर्शवत आहेत. एकूणच, २० जूननंतर मान्सून पुनरुज्जीवनासाठी वातावरणीय परिस्थिती अनुकूल होत असल्याचे संकेत आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातील प्रणाली आणि शेअर झोनची अंतिम स्थिती यावरच मुंबई, ठाणे, पालघर आणि धरण क्षेत्रातील पावसाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे अभिजीत मोडक यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा