
अंतर्गत कोकणात पुढील आठवडा राहणार अशीच गर्मी
कल्याण डोंबिवली दि.4 मार्च :
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कल्याण-डोंबिवली परिसरातील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला असून यंदाच्या मोसमातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केला आहे. (Temperature Crosses 40°C in Kalyan–Dombivli; Season’s Highest Temperature Recorded)
मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार कल्याणमध्ये 40.5 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत 40.4 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी अक्षरशः सूर्य आग ओकतोय की काय असे वाटत होते.
याशिवाय ठाणे, कोपरखैराणे, तळोजा, पनवेल, पालघर, विरार, बदलापूर आदी परिसरातही तापमानाने 39 ते 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी तर तापमान 41 अंशांहून अधिक नोंदवले गेले असून, विक्रमगड येथे तब्बल 42 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच आणि होळीच्या दुसऱ्याच दिवशी उष्णतेचा पारा एवढ्या वेगाने वाढल्याने येत्या काही दिवसांत उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके सुती कपडे घालणे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्च महिन्यात असे होणे ही सामान्य बाब…
अँटीसायक्लोनच्या प्रभावामुळे ईशान्येकडून कोरडे वारे (land breeze) वाहत आहेत. हे वारे जमिनीवरुन वाहत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच समुद्री वारा उशिरा सुरू होत असल्याने उष्णतेची तीव्रता वाढून उष्णतेची लाट (heatwave)सदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली आहे.
दरम्यान, अचानक वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
























