कल्याण डोंबिवली दि.6 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शिवन्ना शेट्टी, शिक्षण समिती सभापतीपदी अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि महिला -बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या तिन्ही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी केवळ यांचेच अर्ज दाखल झाल्याने तिघांची निवड निश्चित झाली होती. (Unopposed Election of Chairpersons for KDMC Standing Committee, Education Committee, and Women & Child Welfare Committee)
या तिन्ही सभापती पदासाठी आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी यांस स्थायी समिती सभापती म्हणून, अभिजीत सुजाता सदानंद थरवळ यांस शिक्षण समिती सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांना महिला – बाल कल्याण समिती सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, निलेश शिंदे, भाजप नगरसेवक जतिन प्रजापती, शामल गायकर, मनसे नगरसेवक गणेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.

