
ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित व्याख्यानाला ७०० हून अधिक विद्यार्थी – राष्ट्रप्रेमी नागरिकांची उपस्थिती
डोंबिवली | दि. २७ मे :
“सावरकर हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते राष्ट्रभक्तीची जाज्वल्य प्रेरणा होते. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांमधून राष्ट्रसेवेची ऊर्जा घेतली पाहिजे,” असे आवाहन प्रख्यात वक्ते, इतिहास अभ्यासक आणि भाषाप्रभू डॉ. सच्चीदानंद शेवडे यांनी केले. (“Veer Savarkar is a blazing inspiration of patriotism; today’s generation must draw the energy of national service from his thoughts,” – Dr. Sachchidanand shevade)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीच्या वतीने आयोजित “अदम्य स्वातंत्र्यवीरांचे लंडन पर्व” या जाहीर व्याख्यान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांसह राष्ट्रप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इतिहास अभ्यासक आणि भाषाप्रभू डॉ. सच्चीदानंद शेवडे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांना सावरकरांच्या क्रांतिकारी जीवनप्रवासाचा जणू प्रत्यक्ष अनुभवच दिला. सावरकरांच्या लंडनमधील क्रांतिकारी कार्याचा सखोल वेध घेत भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात राहूनही सावरकरांनी उभारलेले क्रांतीचे जाळे, त्यांचे धाडस, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि विचारांची ताकद यांचे डॉ. शेवडे यांनी प्रभावी उदाहरणांसह विवेचन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीचे अध्यक्ष संदीप पुराणिक, उपाध्यक्ष महेश शुक्ल, निलेश वीरकर तसेच मान्यवर उपस्थित होते. यानंतर सुनीला पोतदार आणि सहकलाकारांनी सावरकरांच्या गीतांवर सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याविष्काराने सभागृहातील वातावरण अक्षरशः भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणातून देशभक्तीची ऊर्जा आणि स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा अनुभवायला मिळत होती.
या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, मृदुला नाख्ये, आसावरी नवरे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, डोंबिवलीतील सुमारे ७०० हून अधिक विद्यार्थी, युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा पिढीचा सहभाग हा सावरकरांच्या विचारांप्रती वाढणाऱ्या आकर्षणाचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी महासंघाचे कार्यवाह विवेक वामोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर सुनीता जोशी यांनी सादर केलेल्या संपूर्ण “वंदे मातरम्”ने संपूर्ण सभागृह राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

























