
कल्याण | २८ जून :
सध्या रेशनिंग योजनेत धान्य मिळविण्यासाठी निश्चित करण्यात आलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा वास्तवाशी विसंगत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी व्यक्त केलं. यामध्ये तातडीने बदल करणे आवश्यक असून, जोपर्यंत उत्पन्न मर्यादेत वाढ केली जात नाही तोपर्यंत कोणत्याही कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द करू नये किंवा त्यांचे धान्य बंद करू नये अशी ठाम मागणी बैठकीतून सर्वानुमते करण्यात आली. (Signature Campaign Launched in Kalyan Demanding Higher Income Eligibility Limit for Ration Benefits)
या मागणीसाठी पाणबुडे नगर येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी सर्व स्तरातून सह्या मोहीम राबविण्यात येत असून त्याद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. सह्या मोहिमेला वाडीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने सह्या गोळा करण्यात आला.
वस्तिपातळीवर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक महिलांनी सद्याची उत्पन्न मर्यादा वास्तववादी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. रेशनिंगसाठी पात्रता ठरवताना उत्पन्न मर्यादेत बदल करणे आवश्यक असल्याचे आवर्जून नमूद केले. या मोहिमेद्वारे लोकांशी संवाद साधण्यात आला असून पुढील काळात या मागणीला घेऊन होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यास उपस्थितांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे रेशनिंगची उत्पन्न मर्यादा वाढ या प्रश्नांवर व्यापक पाठबळ निर्माण होत आहे.
रेशनिंग कृती समितीने स्पष्टपणे मागणी केली आहे की शहरी भागासाठी सध्या असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रुपयांवरून वाढवून ३ लाख ६० हजार रुपये करावी, तर ग्रामीण भागासाठी असलेली ४४ हजार रुपयांची मर्यादा वाढवून २ लाख ४० हजार रुपये करावी ही ठोस मागणी समितीचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी या बैठकीत केली आहे.

























