Home ठळक बातम्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील धबधबे, गड-किल्ले, धरणे आणि पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे...

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील धबधबे, गड-किल्ले, धरणे आणि पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे | ६ जुलै :

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व धबधबे, गड-किल्ले, धरणे, तलाव, नद्या आणि अन्य पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. (Red Alert in Thane District: Entry to Waterfalls, Forts, Dams & Tourist Spots Prohibited Until Further Orders)

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे पडणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील धबधबे, गड-किल्ले, धरणे, तलाव आणि नदीकाठ परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. मात्र, अतिवृष्टीच्या काळात अशा ठिकाणी दरडी कोसळणे, पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे, पाय घसरणे आणि अपघात होण्याचा धोका वाढत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे, गड-किल्ले, धरणे, तलाव, नद्या आणि इतर पर्यटनस्थळांवर नागरिकांच्या प्रवेशास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संबंधित पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या शासकीय विभागांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे तसेच नागरिकांना प्रवेशबंदीबाबत सूचना फलक, बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक पर्यटन टाळण्याचे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडीओ काढण्यासाठी जाणे टाळण्याचे आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा