Home ठळक बातम्या गुड न्युज: ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे पहिले दोन टप्पे जुलैमध्ये वाहतुकीसाठी खुले होणार

गुड न्युज: ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे पहिले दोन टप्पे जुलैमध्ये वाहतुकीसाठी खुले होणार

महापे, शिळफाटा, कल्याण फाटा येथील वाहतूक जलद होणार

नवी मुंबई – डोंबिवली प्रवास होणार अधिक वेगवान

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने प्रकल्पाची उभारणी

कल्याण | २६ जून :
नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा देणाऱ्या ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे दोन्ही टप्पे जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, नियमित आढावा बैठका, प्रत्यक्ष पाहणी आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळाला असून, लवकरच या मार्गाचा महत्त्वाचा भाग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. (First Two Phases of the Airoli–Katai Elevated Corridor to Open for Traffic in July)

ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवलीदरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सुरुवातीपासून पाठपुरावा…
प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच हा विषय प्राधान्याने हाताळला. एमएमआरडीए मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वारंवार आढावा बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यात आला. प्रकल्पस्थळी वेळोवेळी भेटी देत कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला तसेच आवश्यक त्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत कामाचा वेग वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आता प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले असून ते जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत.तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन करून ते एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.

वाहतूक आणखी जलद होणार…
या दोन्ही टप्प्यांमुळे महापे, शिळफाटा, कल्याण फाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक जलद होणार आहे. मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अखंड व जलद संपर्क निर्माण होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीलाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

तिसऱ्या टप्प्याचे कामही एक ते दीड वर्षात होईल पूर्ण…
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले असून हा टप्पा येत्या एक ते दीड वर्षात पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १२.७१ किलोमीटरचा ऐरोली-काटई उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील वाहतूक अधिक गतिमान होणार असून नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आता प्रत्यक्षात फळाला येत आहे. जुलै महिन्यात पहिला आणि दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम आणि वेगवान करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा