
डोंबिवली दि.5 मार्च :
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात निघणाऱ्या स्वागतयात्रांची जननी म्हणून ओळख असलेल्या संस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा काहीशी वेगळी असणार आहे. यंदाच्या स्वागतयात्रेत वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभक्तीपर उपक्रमांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानालाही अभिवानादन केले जाणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थेतर्फे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या नववर्ष स्वागत यात्रेबाबत माहिती देण्यात आली. (Dombivli New Year Welcome Procession to Commemorate the Sacrifice of Chhatrapati Sambhaji Maharaj with Patriotic Activities)
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २८ वे वर्ष असून यंदाची स्वागतयात्रा वंदे मातरम् गीताला १५० व्या वर्षी या संकल्पनेवर आधारित आहे. श्री गणेश मंदिराच्या पुढाकारातून हा गावकीचा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदा स्वागत यात्रेच्या संयोजन समितीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली असून उत्सवाच्या नियोजनात तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यावर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन विशेष तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५० वर्षांच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ७ मार्च रोजी डोंबिवलीतील ३७ शाळांमधील सुमारे १८०० विद्यार्थी सामुदायिक देवदेशोपासना आणि वंदे मातरम् गायनात सहभागी होणार आहेत.
याशिवाय रविवारी १५ मार्च २०२६ रोजी अथर्वशीर्ष पठण, राष्ट्रभक्तिपर गीत गायन, वादन-नृत्य स्पर्धा, तरुणांसाठी बाईक रॅली, सामुदायिक श्रीसूक्त पठण आणि दीपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ‘शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा’ या गीत-नृत्याविष्कारातून वीरांना आदरांजली भागशाळा मैदान येथे अर्पण करण्यात येणार आहे. तसेच नाशिक येथील महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज युवा पिढीसोबत संवाद साधणार आहेत.
गुरुवारी १९ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड हर्षाली चौधरी थविल यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर पंचांगवाचन, श्रीरामाची महापूजा, प्रतिनिधी गुढी उभारणे तसेच श्री गणरायाच्या पालखीचे पूजन मंगलमय वातावरणात ढोल ताशांचा गजरात स्वागत यात्रेसाठी पालखी प्रस्थान करेल.
भागशाळा मैदान येथून सकाळी सव्वा सात वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ होईल. भागशाळा मैदान, पंडित दीनदयाल पथ द्वारका हॉटेल, रेल्वे मार्ग शिवमंदिर पथ,राजेंद्र प्रसाद पथ, चार रस्ता मानपाडा पथ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा(घरडा सर्कल), बाजीप्रभू चौक, फडके पथ, आप्पा दातार चौक या मार्गे स्वागत यात्रा पालखीसह मार्गक्रम करणार आहे.
या नववर्ष स्वागत यात्रेत १०० हून अधिक संस्था आणि संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामूळे डोंबिवलीकरांनी विशेषतः शहरातील तरुणाईने मोठ्या संख्येने या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वागत यात्रेचा समारोप साडेदहा वाजण्याच्या सुमारास फडके रोडवरील आप्पा दादा चौकात केले जाईल.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्ष अलका मुतालिक, सचिव प्रविण दुधे, उपाध्यक्ष सीए सुहास आंबेकर, श्रीपाद कुलकर्णी, गौरी कुंटे ,राजय कानिटकर,तसेच संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे उपस्थित होते.
























