Home ठळक बातम्या क्या बात है : कल्याणात कृत्रिम हृदयाच्या मदतीने वाचवले महिलेचे प्राण

क्या बात है : कल्याणात कृत्रिम हृदयाच्या मदतीने वाचवले महिलेचे प्राण

आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल

कल्याण दि. ३१ मार्च :
कल्याणातील आरोग्य सेवेला आणि त्याच्या दर्जाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या घटनेची नुकतीच नोंद झाली आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या वृद्ध महिलेचे प्राण कृत्रिम हृदयाच्या (innovative heart pump) (Artificial Heart Impaela 2.5) मदतीने वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही कामगिरी केली असून मुंबईनंतर अशी शस्त्रक्रिया करणारे हे पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथे राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या महिलेला 26 मार्च रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिच्या कुटुंबीयांनी कल्याणला आयुष हॉस्पिटलशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मात्र रायगडहून कल्याणला येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आयुष हॉस्पिटलने सर्वप्रथम स्थानिक रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. परंतु या महिलेसह तिच्या कुटुंबीयांच्या मानत आयुष हॉस्पिटलबद्दल असणाऱ्या विश्वासामुळे त्यांनी रायगड ऐवजी कल्याणला येण्याचा निर्णय घेतला. महाड येथील स्थानिक रुग्णालयात आवश्यक ते प्रथमोपचार घेत या महिलेला कल्याणात आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाब, स्थूलता आणि हृदयविकाराचा त्रास होऊन लोटलेला बराच कालावधी आदी बाबींमुळे जीवावर बेतण्याची शक्यता होती. परंतु आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता तातडीने या महिलेवर आवश्यक ते उपचार करण्यास सुरुवात केली.

बायपासऐवजी अँजिओप्लास्टीचा निर्णय…

या महिलेची अँजिओग्राफी केली असता हृदयाला रक्तपुरवठा मेन आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज आढळून आले. ज्यामुळे तज्ञ डॉक्टरांनी बायपास करण्याचा सल्ला तिच्या कुटुंबियांना दिला. मात्र त्यांनी बायपास करण्यास साफ नकार देत डॉक्टरांना अँजिओप्लास्टी करण्याची विनंती केली.
त्यानूसार आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु या महिलेची मेडीकल हिस्टरी पाहता त्यातही धोका संभवत होता.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डॉक्टरांनी केली प्रयत्नांची शिकस्त…

मात्र हा धोका कमी करण्यासाठी डॉक्टरांनी कृत्रिम हृदय (innovative heart pump) (Artificial Heart Impella 2.5) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. वैद्यकीय क्षेत्रातील या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करत या महिलेला मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे बाहेर काढले. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेमध्ये सर्वात मोलाची साथ निभावली ती कृत्रिम हृदयाने तिच्या हृदयाला रक्तपुरवठा करत ही अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पाडली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना महिला पूर्णपणे शुद्धीमध्ये होती. तिला कोणत्याही प्रकारे भूलीचे इंजेक्शन देण्यात आले नाही. या शस्त्रक्रियेनंतर या महिलेची प्रकृती अतिशय स्थिर असून अवघ्या काही तासांतच ती रुग्णालयात चालू लागली.

या महिलेचे प्राण वाचवू शकलो यापेक्षा मोठे समाधान नाही…
कृत्रिम हृदयाच्या मदतीने या महिलेवर यशस्वीपणे उपचार केल्याबद्दल डॉक्टरांनीही आनंद आणि समाधान व्यक्त केला आहे. वेळ अतिशय नाजूक होती आणि या महिलेची मेडीकल हिस्टरी पाहता पाहता अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया होती. परंतू आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे या महिलेचे प्राण वाचवू शकलो यापेक्षा समाधानाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया आयुष्य हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर पंकज कासार यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

या डॉक्टरांची लाभली मोलाची साथ…

या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर पंकज कासार यांना हृदयविकार तज्ञ डॉ. नागेश वाघमारे, ॲनेस्थेटिक डॉ.संतोष गायकवाड, फिजिशियन डॉ. अमित बोटकुंडले आदी डॉक्टरांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

अशी शस्त्रक्रिया करणारे आयुष तिसरे हॉस्पिटल…

विशेष म्हणजे मुंबईतही केवळ दोनच नामांकित रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली असून अशीच यशस्वी शस्त्रक्रिया करणारे कल्याणातील आयुष हे पहिले हॉस्पिटल ठरले आहे.

2 कॉमेंट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा