Home ठळक बातम्या केडीएमसीचा एक निर्णय : आणि होतेय १८ कोटी यूनीट वीजबचत तर चौदा...

केडीएमसीचा एक निर्णय : आणि होतेय १८ कोटी यूनीट वीजबचत तर चौदा लाख युनिट वीज निर्मिती

सौरऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उत्तुंग भरारी

कल्याण डोंबिवली दि.३१ मार्च :
सौर ऊर्जेबाबत केंद्र – राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी निर्णयाच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीने उत्तुंग भरारी घेतली आहे. केडीएमसीच्या एका निर्णयामुळे महापालिका क्षेत्रात दरवर्षी तब्बल १८ कोटी युनिट इतकी विजेची बचत होत असून १४ लाख ६० हजार युनिट विजेची निर्मिती होत असल्याची सकारात्मक माहिती समोर आली आहे. (A decision of KDMC: And 18 crore units of electricity are being saved and fourteen lakh units of electricity are being generated)

सौरऊर्जा वापराच्या क्षेत्रातील आपले स्थान बळकट…
सौर ऊर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प उभारुन सौर ऊर्जा ह्या ग्रीन एनर्जी प्राधान्य देण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये नगरविकास विभागाने युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसी प्रशासन सौर ऊर्जा वापराच्या क्षेत्रातील आपले स्थान बळकट करत आहे.

दरवर्षी तब्बल १८ कोटी वीज युनिटची बचत…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौरऊर्जा सयंत्रे (solar water system) उभारणे २००७ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. हे सौरऊर्जा सयंत्रे उभारल्यानंतरच विकासकांना नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र (occupation certificate) देण्यात येते. त्यानूसार २००८ ते २०२१ या तेरा वर्षांच्या कालावधीत १ हजार ८१९ इमारतींवर १ कोटी ७ लाख ९७ हजारांपेक्षा अधिक प्रतिदिन लिटर्स क्षमतेचे सौरउष्ण जल सयंत्रे उभरण्यात आली आहेत. ज्यामुळे इमारतींचा वीजेचा मोठ्या प्रमाणत भार कमी झाला असून दरवर्षी तब्बल १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे.

१४ लाख ६० हजार युनिट वीज निर्मिती होणार…
तर गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रात एकूण ६१ इमारतींवर एक मेगावॅट (१०००.५ किलो वॅट) सौर ऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प विकासकाकडून उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे दरवर्षी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १४ लाख ६० हजार युनिट वीज निर्मिती होणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. या वीज निर्मितीमुळे इमारतीसाठी आवश्यक उद्वाहन (lift system), वॉटर पंप, पॅसेज लाईट, आऊट डोअर लाईट आदींसाठी आवश्यक वीजेची गरज आरामात भागणार आहे.

नविन इमारतींवर २ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा वीज निर्मिती प्रकल्प..
महापालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे आस्थापित करुन घेणेसाठी विद्युत विभागाने प्रभावी कार्यपध्दती तयार केलेली असून या कामात विद्युत विभागातील सर्व अभियंता आणि विद्युत कर्मचाऱ्यांचेही योगदान आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर २ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांच्या माध्यमातून उभारण्याचा विद्युत विभागाचा मानस आहे.

सौर ऊर्जेच्या वापराबाबत नागरीकांमध्ये जनजागृतीसाठी…
सौर ऊर्जेच्या वापराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने सरकारी कार्यालये, शाळा आणि विविध सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याचे २३ प्रयोग केले असून जनजागृतीचे हे काम असेच सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या १६ इमारतींवर सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प…
तसेच सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. पथनाट्य माध्यमातून महापालिका क्षेत्रात सौर ऊर्जाबाबत जनजागृती विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. नविन आर्थिक वर्षात महापालिकेच्या १६ इमारतींवर सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प बसविण्यात येणार असल्याची माहितीही विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा