
कल्याण| २८ नोव्हेंबर :
समाजसेवेचा वसा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ अंतर्गत कल्याणमधील सात रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने ‘रोटरी सेवा महोत्सव २०२६-२७’चे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. डॉ. निलेश जयवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीजीएनडी रोटे. नेहा निंबाळकर यांच्या प्रेरणेने हा महोत्सव २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. (Seven Rotary Clubs Unite for ‘Rotary Seva Mahotsav’ in Kalyan; Week-Long Social Initiatives from November 29 to December 6)
‘एक आठवडा सेवा, उज्ज्वल उद्याकडे एक पाऊल’ ही या महोत्सवाची संकल्पना असून, नागरिकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन स्ट्रीट फेस्टिव्हल, सायबर जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, युवकांसाठी शैक्षणिक भेटी, आरोग्य तपासणी, रक्तदान, थॅलेसेमिया जनजागृती आणि महिला सक्षमीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम :
२९ नोव्हेंबर (रविवार) – स्ट्रीट फेस्टिव्हल : सकाळी ७ ते ९ या वेळेत उल्हासनगर येथील गोल मैदानावर स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. कल्याणमधील सर्व रोटरी क्लब उल्हासनगर टीमसोबत या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
३० नोव्हेंबर (सोमवार) – सायबर अवेअरनेस डे : सकाळी १० ते १२ या वेळेत सोनावणे कॉलेज येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम होणार आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी हा लीड क्लब असून अध्यक्षा रोटे. पूर्वा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येईल.
१ डिसेंबर (मंगळवार) – सिनियर सिटिझन्स डे : सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत सिंधी कॉलनी येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील सीनियर सिटीझन हॉल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष रोटे. रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम होणार आहे.
२ डिसेंबर (बुधवार) – यूथ फेस्टिव्हल : शालेय विद्यार्थ्यांसाठी कल्याणमधील स्वीट फॅक्टरी आणि ग्लास फॅक्टरी येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड हा या उपक्रमाचा लीड क्लब आहे.
३ डिसेंबर (गुरुवार) – आरोग्य दिवस : सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बदलापूर येथील बोरीचापाडा येथे आरोग्य तपासणी शिबिर आणि आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सचे अध्यक्ष रोटे. प्रेम मुरहरी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येईल.
४ डिसेंबर (शुक्रवार) – मेगा रक्तदान व थॅलेसेमिया जनजागृती : सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सिंडिकेट, कल्याण येथील विजय सेल्स हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर थॅलेसेमिया या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण सेंट्रलचे अध्यक्ष रोटे. धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम होईल.
५ डिसेंबर (शनिवार) – महिला सक्षमीकरण दिवस : दुपारी ४ ते ६ या वेळेत कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक येथे महिलांसाठी सक्षमीकरण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष रोटे. दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड आणि रोटरी क्लब ऑफ ऊर्जा कल्याण यांच्या सहकार्याने हा उपक्रम होईल.
६ डिसेंबर (रविवार) – भव्य समारोप सोहळा : आठवडाभर राबविण्यात आलेल्या विविध सेवाप्रकल्पांचा आढावा घेत रोटरी सेवा महोत्सवाचा भव्य समारोप करण्यात येणार आहे.
या महोत्सवाबाबत बोलताना असिस्टंट गव्हर्नर रोटे. डॉ. सुश्रुत वैद्य यांनी सांगितले की, “कल्याणमधील सात रोटरी क्लब एकत्र येऊन समाजाच्या विविध घटकांसाठी सेवाकार्य करीत आहेत, हीच आमची खरी ताकद आहे. एकत्रित प्रयत्नांतून अधिक व्यापक सामाजिक परिणाम साध्य करता येतो. या महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” या महोत्सवाच्या नियोजनासाठी कोअर टीममध्ये डॉ. सार्जेराव सावंत, रोटे. देवराम गागरे, रोटे. दिनेश कोरेगावे, रोटे. मिलिंद बल्लाळ, रोटे. जय कारिया आणि रोटे. सतीश भोजने यांचा समावेश आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी सातही क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व रोटेरियन्स आणि प्रकल्प प्रतिनिधी मनःपूर्वक प्रयत्नशील आहेत. सेवा, सहकार्य आणि सामूहिक सहभागातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश देणारा हा रोटरी सेवा महोत्सव कल्याण परिसरासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरणार आहे.

























