Home ठळक बातम्या वाघेरेपाड्यात आदिवासी दिनाचा जल्लोष; रानभाज्यांच्या स्पर्धेतून जपली निसर्गाशी नाळ

वाघेरेपाड्यात आदिवासी दिनाचा जल्लोष; रानभाज्यांच्या स्पर्धेतून जपली निसर्गाशी नाळ

कल्याण ग्रामीण|९ ऑगस्ट :
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि सामूहिक जीवनपद्धतीचा जागर करण्यासाठी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कल्याणजवळील वाघेरेपाडा येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. अन्न अधिकार अभियान आणि जिल्हा परिषद शाळा, वाघेरेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Grand Celebration of Tribal Day in Wagherepada; Traditional Wild Vegetable Competition Revives the Bond with Nature)

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने निसर्गपूजनाने करण्यात आली. सुपामध्ये परिसरातील विविध रानभाज्या, निसर्गातील देणगी आणि स्थानिक जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या. प्रमुख पाहुण्या मुक्ता श्रीवास्तव यांच्या हस्ते निसर्गपूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी जीवनपद्धतीमध्ये निसर्गाला असलेले सर्वोच्च स्थान अधोरेखित झाले.

शाळेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने उत्साहाने राबविणाऱ्या शिक्षिका आशा शिंगाडे, अरुणा भोये आणि अंगणवाडी सेविका अंजना कडव यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले. यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य आणि लेझीमच्या तालावर केलेले उत्स्फूर्त सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवून गेले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मुक्ता श्रीवास्तव यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. आदिवासी समाजाची ओळख ही केवळ एका समुदायाची ओळख नसून त्यांच्या परंपरा, संस्कृती, ज्ञानव्यवस्था आणि निसर्गाशी असलेल्या सहजीवनातून ती अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी आदिवासी समाज आणि निसर्ग यांच्यातील अतूट संबंधावर प्रकाश टाकला. जंगल, जमीन, पाणी, रानभाज्या आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यात आदिवासी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

*रानभाज्यांच्या स्पर्धेने वेधले लक्ष*

कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे रानभाज्यांची स्पर्धा. या स्पर्धेत वाघेरेपाड्यातील तब्बल ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक उपलब्ध साधनसंपत्तीचा सुंदर मिलाफ या स्पर्धेत पाहायला मिळाला.

महिलांनी तेलपाट, कुरडू, कुयळू, टाकळा, कंटोली, चायवळ यांसह विविध रानभाज्यांपासून तयार केलेले पारंपरिक पदार्थ आणि रेसिपी सादर केल्या. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि बाजारपेठेवर वाढत्या अवलंबित्वाच्या काळात आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे पोषणमूल्य, पारंपरिक उपयोग आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा हा उपक्रम ठरला. या स्पर्धेचे परीक्षण नयन जाधव यांनी केले. प्रत्येक महिलेने आपल्या रेसिपीमागील पारंपरिक पद्धत, स्थानिक ज्ञान आणि रानभाजीचा उपयोग याबाबत माहिती दिल्याने स्पर्धेला केवळ स्पर्धात्मक नव्हे, तर ज्ञानवर्धक स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक सामूहिक तारपा नृत्य सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजत पुजारी, विनायक मरकडे, आकाश फसाळे, विलास लचके, सागर कांबडी, अभय लचके, रितेश आगिवले, सिद्धेश मरकडे यांच्यासह वाघेरे पाड्यातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा