Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीसाठी महत्त्वाची माहिती: केडीएमसी क्षेत्रात आता दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा...

कल्याण डोंबिवलीसाठी महत्त्वाची माहिती: केडीएमसी क्षेत्रात आता दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद; १९ नोव्हेंबरपासून कपातीची अंमलबजावणी

एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे नियोजन

कल्याण डोंबिवली | १७ नोव्हेंबर
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात झालेली घट आणि पुढील वर्षापर्यंत या परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध जलसाठ्यांचे काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार असून, १९ नोव्हेंबरपासून दर गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Important Update for Kalyan-Dombivli: KDMC to Implement 24-Hour Water Cut Every Thursday from November 19)
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सूचनांनुसार राज्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात कपात लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीणमधील इतर गावांचा आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम परिसराचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक आठवड्यात गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या २४ तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही
या पाणीपुरवठा कपातीदरम्यान नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशीही महापालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आपल्या आवश्यकतेनुसार पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

दरम्यान, उपलब्ध जलसाठ्यांचे योग्य नियोजन आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा