Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी फेरीवाल्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी; सत्ताधारी पक्षालाच आंदोलन करण्याची वेळ...

कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी फेरीवाल्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी; सत्ताधारी पक्षालाच आंदोलन करण्याची वेळ – काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

डोंबिवली | १३ जून :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता असताना त्याच पक्षांच्या नेत्यांना फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ का येते, असा रोखठोक सवाल उपस्थित करत काँग्रेसचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच महापौर हर्षाली चौधरी यांनी फेरीवाल्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Kalyan-Dombivli Mayor Must Clarify Stand on Hawkers; Why Is the Ruling Alliance Forced to Protest? – Congress District President Amit Mhatre Slams Authorities)

डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर काँग्रेसने आपली भूमिका मांडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे, एकनाथ म्हात्रे, वर्षा शिखरे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अमित म्हात्रे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नुकतेच निळजे परिसरात शिवसेनेकडून फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र दुसरीकडे महापौर हर्षाली चौधरी फेरीवाल्यांकडून खरेदी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे महापौर नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे.

“महापौर फेरीवाले हटविण्याच्या बाजूने आहेत की त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यास समर्थन देत आहेत, हे नागरिकांना समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षांनी जनतेची दिशाभूल न करता स्पष्ट भूमिका घ्यावी,” असे म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानातील उद्यानाचाही मुद्दा उपस्थित केला. संबंधित उद्यानात भाजपचे पक्षचिन्ह लावण्यात आल्याचा आरोप करत ते तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा महापालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करून काँग्रेस कार्यकर्ते स्वतः ते चिन्ह हटवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरातील परिवहन सेवेची दुरवस्था, वाढता कचरा प्रश्न, अपुऱ्या नागरी सुविधा, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे होत असलेले दुर्लक्ष यावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आंदोलनाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आगामी काळात रस्ते, पाणीपुरवठा, फेरीवाला धोरण, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही अमित म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा