
महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
कल्याण | ३१ जुलै :
कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली थविल- चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २७ गाव परिसर आणि टिटवाळा भागातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासारखे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.(Kalyan-Dombivli to Get a State-of-the-Art CCTV Surveillance Network; KDMC and Police Join Forces to Curb Rising Crime)
अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचा निर्णय…
बैठकीत शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या डीपीआरनुसार शहरातील महत्त्वाच्या चौक, रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय सध्या नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून ते महापालिकेच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) शी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर रिअल-टाइम नजर ठेवणे शक्य होणार आहे.
२७ गाव आणि टिटवाळा पोलिसांच्या रडारवर…
बैठकीत विशेषतः २७ गाव आणि टिटवाळा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या भागात पोलिसांची गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले…
शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढविणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करत शैक्षणिक परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला.
मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी आणि अमली पदार्थांवर धडक कारवाई
टिटवाळा परिसरासह शहरात सुरू असलेल्या गांजा, चरस, मटका, जुगार आणि ऑनलाइन लॉटरीसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारच्या गैरकृत्यांना खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
‘नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही’…
महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला.
या बैठकीला महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, शिवसेना (उबाठा ) गटनेते उमेश बोरगांवकर, काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी, नगरसेवक कुणाल पाटील, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे, राजेंद्र खेडेकर, मुकेश ढगे, बळीरामसिंग परदेशी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

























