Home ठळक बातम्या केडीएमसी निवडणूक ;14 लाखांहून अधिक मतदार आणि 1600 च्या आसपास मतदान केंद्र...

केडीएमसी निवडणूक ;14 लाखांहून अधिक मतदार आणि 1600 च्या आसपास मतदान केंद्र तर 9 ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एसएसटीसह विविध पथके कार्यान्वित

कल्याण दि.19 डिसेंबर :
येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 14 लाख 24 हजारांहून अधिक मतदार असून सुमारे 1583 मतदान केंद्र असून यंदा प्रथमच 9 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता आहे. तर कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एसएसटीसह विविध पथके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.महापालिका निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (KDMC Election: Over 14 Lakh Voters, Around 1,600 Polling Booths; Counting Likely at 9 Centres)

महापालिका निवडणुकीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी दि. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, छाननीनंतर तात्काळ वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख दि. २ जानेवारी २०२६ आहे. निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवार यादी दि. ३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होईल. मतदान दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी व निकाल दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.

31 प्रभागांसाठी 9 निवडणूक अधिकारी…
महानगरपालिकेतील एकूण ३१ प्रभागांसाठी शासनामार्फत ९ रिटर्निंग ऑफिसर्स (RO) आणि त्यांच्या सहाय्यासाठी प्रत्येकी ३ सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर्स (ARO) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, संबंधित तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी हर्षल गायकवाड नोडल अधिकारी…
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची एमसीसी (Model Code of Conduct) नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स (SST), फ्लाइंग स्क्वॉड टीम्स (FST), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स (VST) तसेच खर्च निरीक्षण पथके कार्यान्वित करण्यात येत आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने सीमावर्ती भागात ९ ठिकाणी तपास पथके स्थापन केली जाणार आहेत.

20 डिसेंबर रोजी जाहीर होणार अंतिम मतदान केंद्र…
मतदान केंद्रांबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, सध्या १५८३ मतदान केंद्रे प्रस्तावित असून, रिटर्निंग ऑफिसर्सकडून अंतिम पाहणी झाल्यानंतर २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

विविध परवानग्यासाठी सिंगल विंडो परमिशन सिस्टीम’ लागू…
निवडणूक प्रक्रियेसाठी ‘सिंगल विंडो परमिशन सिस्टीम’ लागू करण्यात आली असून, प्रत्येक RO स्तरावर तसेच मुख्यालयात स्वतंत्र सुविधा कक्ष कार्यरत राहणार आहे. सभा, मिरवणूक, वाहन परवाने, बॅनर्स, पोस्टर्स आदींसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानग्या देण्यात येतील. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात प्रचारासाठी वाहन वापरास मुख्यालयातून परवानगी आवश्यक राहील, तर प्रभागस्तरावरील कार्यक्रमांसाठी संबंधित RO स्तरावर परवानगी उपलब्ध असेल.

पेड न्यूजसह सोशल मीडिया कंटेंट, जाहिरातींवर काटेकोर नजर…
माध्यमांविषयी माहिती देताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली असून, पेड न्यूज, दिशाभूल करणारी माहिती, सोशल मीडिया कंटेंट आणि जाहिरातींवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडिया सर्वांनाच आदर्श आचारसंहिता लागू राहील.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व खबरदारी
सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून Vulnerability Mapping, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून निवडणूक काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये.

यंदा प्रथमच 9 ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता…
ईव्हीएम संदर्भात माहिती देताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, मशीन प्राप्त झाल्यानंतर RO स्तरावर वितरण, सीलिंग, स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन तसेच मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी ९ ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात येत आहेत. यापूर्वी कल्याण एपीएमसी बाजार किंवा वै. संतश्रेष्ठ श्री सावळराम महाराज क्रीडा संकुलात एकच ठिकाणी मतमोजणी केली गेली आहे. परंतु यंदा त्याऐवजी 9 निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्तरावर ती घेण्याचा विचार केला जात असल्याची माहितीही आयुक्त गोयल यांनी दिली.

तसेच निवडणूक प्रचारासाठी ७ मैदाने निश्चित करण्यात आली असून, सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एकूणच निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाची संपूर्ण तयार झाली असून, माध्यमांनीही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा