
नागरिक, संस्था आणि Bulk Waste Generators यांच्यावर कचरा वर्गीकरणाची जबाबदारी; नियमभंग करणाऱ्यांवर ‘Polluter Pays Principle’नुसार कारवाई
कल्याण डोंबिवली | १२ ऑगस्ट
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने महापालिका प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिक, व्यापारी, संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांना कचऱ्याचे स्त्रोतावरच वर्गीकरण करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. (Negligence in Waste Segregation to Prove Costly; KDMC Orders Strict Implementation of Solid Waste Management Rules)
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन – वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार हे नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू झाले आहेत. या नियमांनुसार प्रत्येक नागरिक आणि संस्थेवर कचरा वर्गीकरण तसेच वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींची प्रभागनिहाय जबाबदारी…
घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या प्रभागात नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करून त्यांना ओला -सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत, स्थानिक स्वराज्य संस्थेशी समन्वय साधून नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
कचरा वर्गीकरणामध्ये नागरिकांची जबाबदारी…
नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो अधिकृत कचरा संकलन यंत्रणेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.
* ओला कचरा – अन्न, भाजीपाला व स्वयंपाकघरातील कचरा
* सुका कचरा– प्लास्टिक, कागद, धातू, काच इत्यादी
* सॅनिटरी कचरा– डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी
* विशेष/घातक कचरा – बॅटरी, बल्ब, औषधे, ई-कचरा इत्यादी
* कचरा घंटागाडीला वर्गीकरण करूनच द्यावा.
* सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.
* प्लास्टिक, बांधकाम कचरा आणि ई-कचरा स्वतंत्रपणे द्यावा.
* ओला व सुका कचरा एकत्र करू नये.
* सॅनिटरी कचरा सुरक्षितरीत्या गुंडाळून द्यावा.
* कचरा जाळणे किंवा नाले, रस्ते व उघड्या जागेवर टाकणे टाळावे.
Bulk Waste Generators साठीही कठोर नियम…
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या Bulk Waste Generators (BWG) यांच्यावरही स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या संस्था/इमारती/संकुले किंवा दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणारे अथवा दररोज ४० हजार लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणारे घटक या श्रेणीत येतात.
अशा आस्थापनांनी कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन करून शक्य तिथे ओल्या कचऱ्यावर जागेवरच कंपोस्ट किंवा बायोगॅस प्रक्रिया करणे अपेक्षित आहे.
* कचऱ्याची स्वतंत्र साठवणूक व वर्गीकरण करणे.
* ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करणे.
* प्रक्रिया न केलेला कचरा उघड्यावर टाकू नये.
* महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचनांचे पालन करणे.
* अधिकृत कचरा प्रक्रिया यंत्रणेशी समन्वय ठेवणे बंधनकारक.
*नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई*
महापालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा आस्थापनांना ‘Polluter Pays Principle’नुसार दंडात्मक कारवाई तसेच पर्यावरण भरपाई आकारली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
‘स्वच्छ कल्याण-डोंबिवली’ ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कचरा निर्मितीपासूनच त्याचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.


























