Home ठळक बातम्या दुर्गाडी घाट परिसरात ॲस्पिरंट्स कॉलेजच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम; पर्यावरण...

दुर्गाडी घाट परिसरात ॲस्पिरंट्स कॉलेजच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

सामाजिक जबाबदारीच्या शिक्षणाला कृतीची जोड; भुषण कुटे सर आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा पुढाकार

कल्याण | २१ ऑक्टोबर
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव जोपासत कल्याणातील नामांकित ॲस्पिरंट्स कॉलेज अँड ॲकॅडमीच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. (Over 100 Aspirants College Students Participate in Cleanliness Drive at Durgadi Ghat, Kalyan, Promoting Environmental Conservation)

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्यासोबतच पर्यावरणाप्रती जबाबदारी जपण्याचा संदेश दिला. या उपक्रमात कॉलेजचे कर्मचारीही सहभागी झाले होते. भुषण कुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.

ॲस्पिरंट्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहा विविध आयामांवर भर दिला जातो. यामध्ये ‘सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारी’ हा एक महत्त्वाचा आयाम आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या विचारातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. निसर्गाचे संवर्धन करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणे, ही जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची भूमिका असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आल्याचे भूषण कुटे यांनी सांगितले.

शिक्षण हे केवळ पुस्तके आणि वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसते, तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे असते. ॲस्पिरंट्स कॉलेजच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याची संधी मिळाली.

‘स्वच्छ परिसर, जबाबदार नागरिक आणि उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेला कृतीची जोड देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा