
कल्याण | ११ जून :
कल्याणमधील व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या माजी काँग्रेस नेते ठक्कर यांची शिवसेना व्यापारी सेलच्या कल्याण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांचा वारसा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. (Vimal Thakkar Appointed as Kalyan City President of Shiv Sena’s Traders Cell)
ठक्कर यांनी नियुक्तीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पाठबळामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते आणि शिवसेना नगरसेवक सचिन पोटे यांच्या उपस्थितीत ठक्कर यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे, ठक्कर हे यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि कल्याण शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेली विकासकामे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविलेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यावेळी सांगितले होते.
ठक्कर यांचा व्यापारी वर्गात विशेषतः गुजराती आणि मारवाडी समाजामध्ये चांगला प्रभाव मानला जातो. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे दोन्ही समाज पारंपरिकरित्या भाजपचा प्रभावी मतदारवर्ग मानले जातात. अशा परिस्थितीत ठक्कर यांच्याकडे व्यापारी सेलची धुरा सोपवून शिवसेना व्यापारी वर्गामध्ये आपले संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. तर व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविणे, व्यापारी वर्गाचे संघटन अधिक बळकट करणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार विमल ठक्कर यांनी व्यक्त केला आहे.



























