Home ठळक बातम्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले; कल्याणच्या या भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले; कल्याणच्या या भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद

कल्याण | ६ जुलै :
सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरल्याने तेथून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परिणामी कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे. (Heavy Rains Disrupt Water Supply: Mohili Water Treatment Plant Flooded, Several Kalyan Areas Face Temporary Water Cut)

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उल्हास नदीच्या पात्रातील पाणी वेगाने वाढून मोहिली जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जलशुद्धीकरण केंद्राचे कामकाज तात्पुरते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातून होणारा नियमित पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

याचा फटका कल्याण (पश्चिम) विभागातील शहाड, भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, रामबाग-जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा चौक परिसर तसेच संपूर्ण ‘अ’ प्रभाग आणि अशोकनगर वालधुनी, शिवाजीनगर वालधुनी या भागांना बसणार आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, उल्हास नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मोहिली जलशुद्धीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित भागांचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.

दरम्यान, महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. सततच्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर महापालिका प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थिती सुधारल्यानंतर पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा