Home क्राइम वॉच ड्रग्ज तस्करीविरोधात खोणी-पलावामध्ये पोलिसांचे मोठे कोंबिंग ऑपरेशन; 24 नायजेरियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्ज तस्करीविरोधात खोणी-पलावामध्ये पोलिसांचे मोठे कोंबिंग ऑपरेशन; 24 नायजेरियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात

अंमली पदार्थ विरोधात ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई

डोंबिवली | 23 मे :
कल्याण डोंबिवलीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाईने चांगलाच वेग घेतला असून कल्याणातील आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा नायजेरियन नागरिकांकडे वळवला आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी डोंबिवलीजवळील खोणी – पलावा भागात मोठ्या संख्येने वास्तव्याला आलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात कोंबिंग ऑपरेशन राबवले. ज्यामध्ये युगांडा, घानासारख्या देशातील पुरुष महिलांसह 24 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे. (Major Police Combing Operation Against Drug Trafficking in Khoni-Palava; 24 Nigerian Nationals Detained)

ताब्यात घेतलेल्या 8 जणांकडे वैध कागदपत्रे नाही…
विशेष म्हणजे या कोंबिंग ऑपरेशनमध्ये ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे 2 एसीपी, 25 पोलीस अधिकारी आणि सुमारे 80 कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांनी खोणी – पलावा भागातील गृहसंकुलांमध्ये आज सकाळपासून विविध ठिकाणी छापेमारी करत संशयितांची चौकशी केली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये 14 पुरुष, 7 महिला आणि 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिस तपासात 7 जणांकडे वैध कागदपत्रे असल्याचे समोर आले. मात्र 8 जणांकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे आढळले. तसेच 9 जणांविरोधात NDPS कायद्यानुसार विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून त्यांचे पासपोर्ट न्यायालयात जमा असल्याची माहितीही डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.

त्या घरमालक आणि एजंटवरही होणार कारवाई…
यापैकी एका नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणात ताब्यात घेतले आहे. खोणी-पलावा परिसरात काही विदेशी नागरिक हे बेकायदेशीरपणे भाडेकरार (Agreement) करून राहत असल्याचेही तपासात उघड झाले असून संबंधित घरमालक आणि एजंट यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान एका महिलेने पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 

ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या या कारवाईनंतर खोणी – पलावा परिसरातील बेकायदेशीर वास्तव्य, अंमली पदार्थ व्यवहार आणि आफ्रिकन देशातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात वास्तव्याने पुन्हा अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा