Home ठळक बातम्या कल्याण परिमंडलात साडेपाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे २५१ कोटींची वीजबिल थकबाकी

कल्याण परिमंडलात साडेपाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे २५१ कोटींची वीजबिल थकबाकी

थकबाकीदारांनी चालू बिलासह थकबाकी भरण्याचे आवाहन

कल्याण/वसई/पालघर: दि.२५ ऑगस्ट :

महावितरणच्या कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे (कृषिपंप तसेच तात्पुरते किंवा कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) २५१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे थकित रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (In Kalyan Parimandal, more than five and a half lakh consumers have outstanding electricity bills of Rs. 251 crores)

५ लाख ५८ हजार १८५ ग्राहकांकडे २५१ कोटींची थकबाकी…
थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी फिल्डवर आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील ५ लाख ५८ हजार १८५ ग्राहकांकडे २५१ कोटींचे वीजबिल थकीत आहे.

कल्याण डोंबिवलीत एक लाख ग्राहकांकडे 43 कोटींची थकबाकी…
कल्याण पूर्व – पाश्चिम आणि डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकअंतर्गत १ लाख ४ हजार ७६९ ग्राहकांकडे ४३ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कल्याण मंडल दोनमध्ये १ लाख ६५ हजार १२९ ग्राहकांकडे ८३ कोटींची थकबाकी…
उल्हासनगर एक – दोन आणि कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत १ लाख ६५ हजार १२९ ग्राहकांकडे ८३ कोटी ६२ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे.

वसई – विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख ९५ हजार ३७२ ग्राहकांकडे ७८ कोटी ४१ लाख तर पालघर मंडलातील ९२ हजार ९१५ ग्राहकांकडे ४४ कोटी ९३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २ लाख ८६ हजार ग्राहकांकडे २८६ कोटीची थकबाकी…
याशिवाय कल्याण परिमंडलातील तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ६७ हजार ४६६ ग्राहकांकडे ४६ कोटी १४ लाख रुपयांची तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २ लाख ८६ हजार ४७७ ग्राहकांकडे तब्बल २८६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन…
वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगमार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी आणि इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा