
पंडीत सुरेश तळवलकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
कल्याण | १२ जुलै :
शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हेच आपले ध्येय मानून गेली शंभर वर्षे अखंड संगीतसेवा करणाऱ्या कल्याण गायन समाज या ऐतिहासिक संस्थेच्या शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा रविवारी (१२ जुलै) कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. संगीत, संस्कृती आणि परंपरेचा संगम घडविणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना कल्याण गायन समाज शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pandit Hariprasad Chaurasia Receives Kalyan Gayan Samaj Centenary Award as Society Marks Grand Finale of Its 100th Year Celebrations)
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कल्याण गायन समाजाच्या कलाकारांनी सादर केलेल्या “ज्ञाना झालासी पावन” या अभंग संकीर्तनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसामध्ये न्हाऊन गेले. मनोज देसाई, महेश कंटे, कौस्तुभ आपटे, दीपाली देसाई, स्वप्निल भाटे, प्रथमेश तारळकर, ईशान भट, प्रथमेश मोहिते आणि दीपक घारपुरे यांनी सादरीकरण केले. तर वरद कठापूरकर यांच्या बासरीवादनाला रसिकांची विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अतुल वझे आणि अनुष्का बर्वे यांनी केले.
दुसऱ्या सत्राची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. डोंबिवलीचे चित्रकार प्रभु कापसे यांनी रेखाटलेले हे चित्र संस्थेच्या सभागृहात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
तसेच राम जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कल्याण गायन समाजाच्या शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशनही आणि संस्थेच्या शतकभराच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘स्वरहोत्र’ या लघुपटाचे अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही ध्वनिचित्रफीत आता कल्याण गायन समाजाच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव आणि शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी संस्थेच्या शतकभराच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. आपल्या मनोगतात पं. सुरेश तळवलकर यांनी कल्याण गायन समाजाच्या कार्यकर्त्यांची निष्ठा, कार्यपद्धती आणि संगीतसेवेचे विशेष कौतुक केले. तसेच संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकिशोर मुजुमदार आणि जयंत फडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू ठरला तो पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आलेला कल्याण गायन समाज शताब्दी पुरस्कार. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रुपये १,११,१११ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार स्वीकारताना पं. हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, “माझ्या निस्सीम चाहत्यांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी पद्मविभूषण पुरस्काराइतकाच मोलाचा आहे.” तर पं. सुरेश तळवलकर यांनी, “हा सन्मान केवळ पं. हरिप्रसाद चौरसिया यांचाच नसून संपूर्ण संगीतविश्वाचा आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी कल्याण गायन समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत दांडेकर यांनी आभार प्रदर्शन करताना, “शताब्दीपूर्ती हा शेवट नसून नव्या शतकातील संगीतसेवेच्या प्रवासाची सुरुवात आहे,” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम मोडक, कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, नगरसेवक शामल गायकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

























