Home ठळक बातम्या गुरु-शिष्यांच्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर मंत्रमुग्ध ; गुरुकुल प्रतिष्ठानच्या ‘परंपरा’ कार्यक्रमात संगीत...

गुरु-शिष्यांच्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर मंत्रमुग्ध ; गुरुकुल प्रतिष्ठानच्या ‘परंपरा’ कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी

कल्याण | ३० ऑगस्ट :
गुरु-शिष्य परंपरेतून भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि रसिकांना भारतीय संगीताच्या विविध प्रवाहांचा अनुभव देणे, या उद्देशाने गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ‘परंपरा’ या सांगीतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या आठव्या पर्वात बासरीच्या सुमधुर स्वरांनी कल्याणकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांपासून संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांपर्यंतच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणांनी मैफलीला विशेष रंगत आणली. (Soulful Flute Notes Mesmerise Kalyan; Musical Maestros Grace Gurukul Pratishthan’s ‘Parampara’)

कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘ॐ जय जगदीश हरे’ या लोकप्रिय भजनाच्या सादरीकरणाने केली. त्यानंतर ‘जयोस्तुते’चे बासरीवर सुरेल सादरीकरण झाले. भारतीय भावसंगीतातील वैविध्य अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मधुमास हा नवा’ यांसारख्या लोकप्रिय मराठी चित्रपटगीतांसह देवीच्या गोंधळातील विविध गीतांचेही बासरीवादन केले. शास्त्रीय, भावगीत आणि लोकसंगीताचे विविध पैलू बासरीच्या सुरावटीतून उलगडत गेले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमातील नवोदित कलाकारांच्या सादरीकरणांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर गुरू आणि गुरुकुलचे कल्याण शाखा प्रमुख बासरीवादक प्रशांत बानिया यांनी शास्त्रीय रागांवर आधारित एकल बासरीवादन सादर केले. आलाप, स्वरांची मांडणी आणि रागदारी संगीताची वैशिष्ट्ये बासरीच्या मधुर स्वरांतून उलगडत त्यांनी रसिकांना शास्त्रीय संगीताची अनुभूती दिली. त्यांना तबलावादक स्वप्निल भाटे यांनी समर्थ साथ दिली.

गुरुकुल प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा बासरीवादक पंडित विवेक सोनार आणि सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद फजल कुरेशी यांची बासरी-तबला जुगलबंदी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. दोन्ही कलाकारांनी आपल्या वादनातील तांत्रिक सफाई, लयकारी आणि परस्पर सांगीतिक संवादातून जुगलबंदीचे अप्रतिम दर्शन घडवले. बासरीच्या सुरेल स्वरांना तबल्याच्या दमदार लयीची साथ लाभल्याने सभागृहातील वातावरण संगीतमय झाले.

नवोदित कलाकारांना संधी देतानाच अनुभवी कलाकारांच्या सादरीकरणातून संगीताची परंपरा आणि विविधता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘परंपरा’ उपक्रमाचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवला. गुरु-शिष्य परंपरेतील सातत्य जपत नव्या पिढीला भारतीय संगीताशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. निवेदिका प्राजक्ता आपटे यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध निवेदन केले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुकुल प्रतिष्ठानला शुभेच्छा देत, कल्याण शाखाप्रमुख बासरीवादक प्रशांत बानिया यांचे विशेष कौतुक केले. भारतीय सांगीतिक संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरू पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा