Home Uncategorised कल्याणात 2 ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

कल्याणात 2 ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेचा पुढाकार

कल्याण दि.2 मार्च :
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या विद्यमाने येत्या रविवारी 3 मार्च रोजी 2 ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये तब्बल 650 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून 17 ग्रँडमास्टर आणि इंटरनॅशनल मास्टरचाही समावेश आहे.

कल्याण आणि आसपासच्या परिसरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 2 लाखांची 97 रोख बक्षिसे – ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग…
कल्याणात येत्या रविवारी होणाऱ्या या 2 ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विक्रमादित्य कुलकर्णी, मोहम्मद नुबेरशहा शेख, मित्रबा गुहा, कार्तिक वेंकटरमण, आर.आर.लक्ष्मण आदी 17 इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँडमास्टर खेळाडू सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने दिग्गज खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. तर कल्याण डोंबिवली परिसरातून 200 च्या आसपास स्पर्धक यामध्ये भाग घेणार असून 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 76 वर्षांच्या आजोबांचा यात समावेश आहे. तर रॅपिड फॉरमॅट (जलदगती) पद्धतीने ही बुद्धीबळ स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचेही संजय पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा