Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात 35 हजार 560 दिव्यांग मतदार ; विनाअडथळा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून...

ठाणे जिल्ह्यात 35 हजार 560 दिव्यांग मतदार ; विनाअडथळा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून विविध सुविधा

ठाणे दि. 26 एप्रिल :
ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणनेने विशेष व्यवस्था केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही निवडणूक दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यासह रॅम्पची व्यवस्था, व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, मतदानासाठी प्राधान्य, मदतनीस देणे यासह विविध सुविधा देण्याची तयारी केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. (35 thousand 560 disabled voters in Thane district; Various facilities from Election Commission for hassle free voting)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तीनही मतदारसंघात राज्यातील पाचव्या टप्प्यात येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्विपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. तसेच मतदानापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.

जिल्ह्यात 35 हजार 560 दिव्यांग मतदार…
जिल्ह्यात तीनही मतदारसंघात मिळून एकूण 66 लाख 32 हजार 404 मतदार असून यामध्ये 35 हजार 560 मतदार हे दिव्यांग आहेत. यामध्ये 23 भिवंडी मतदारसंघात 9 हजार 250 दिव्यांग मतदार असून 24 कल्याण मतदारसंघात 11023 आणि 25 ठाणे मतदारसंघात 15 हजार 287 दिव्यांग मतदार आहेत.

4 हजार 714 व्हिलचेअरची आवश्यकता…
या दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात 4 हजार 714 व्हिलचेअरची आवश्यकता असून त्यापैकी 1 हजार 454 व्हिलचेअर उपलब्ध आहेत. शहरी भागातील 3 हजार 569 व्हिलचेअर उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदांना कळविण्यात आले आहे.

व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार…
ज्या इमारतीमध्ये 1 किंवा 2 मतदान केंद्रे असतील तेथे 1 व्हिलचेअर, 2 ते 3 मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी 2 व्हिलचेअर आणि 4 ते 5 मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी 3 व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर…
याबरोबरच दिव्यांग मतदारांना सुलभ व्हावे, यासाठी तीनही लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर आणली आहेत. तसेच आवश्यक तेथे रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहेत.

दिव्यांगाना मतदानासाठी प्रथम प्राधान्य…
मतदान केंद्रामध्ये दिव्यांगाना मतदानासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार मदतनीसही देण्यात येणार आहे. मतदान केंद्र परिसरात पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय, विश्रांती कक्ष इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रांवर आणण्यासाठी – घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था…
तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रावर आणणे तसेच परत घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम आणि समन्वयक अधिकारी संजय बागूल यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघासाठी खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

भारत निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक बाबींसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून चित्तरंजन धनगडा माझी (आयआरएस), 24 कल्याण मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रा प्रकाश मीना (आयआरएस) आणि राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा