कल्याण दि. २४ जानेवारी :
थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल अडीचशे प्रकारचे तब्बल दोन हजार गुलाबपुष्प पाहण्याची नामी संधी कल्याणकरांना उपलब्ध झाली आहे. सेंच्युरी रेयॉन प्रस्तुत आणि कल्याण रोझ क्लबसह बिर्ला कॉलेज, मुंबई रोझ सोसायटी आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून बिर्ला कॉलेजमध्ये अनोख्या रोझ शो चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये वेगवेगळया रंगांचे, आकाराचे आणि प्रकारचे गुलाब प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत. (Kalyan rose show in birla college )
बिर्ला महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या रोझ शो चे उद्घाटन कल्याण रोझ क्लबच्या अध्यक्षा संतोष चितलांगे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्र, इंडीयन रोझ असोसिएशनचे सह सचिव डॉ. विकास म्हैसकर, इनर व्हील क्लब कल्याणच्या माजी अध्यक्षा मेघना म्हैसकर, बिर्ला कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. अविनाश पाटील, केडीएमसी सचिव संजय जाधव, सीए संघटनेचे कल्याण युनिटचे अध्यक्ष कौशिक गडा आदी मान्यवर उपस्थित होते.
आज (२४ जानेवारी आणि २५ जानेवारी ) आणि उद्या असे दोन दिवस हे गुलाब पुष्प प्रदर्शन सुरू राहणार असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या प्रदर्शनात पुणे, नाशिक , कल्याण येथील वेगवेगळया प्रकारचे गुलाब मांडण्यात आले आहेत. ज्यामधे सुवासिक आणि सुवास नसलेले अशा गुलाब पुष्पांचाही समावेश आहे. तर या गुलाब प्रदर्शनासोबतच निवडुंगाच्या (cactus) वेगवेगळया प्रजाती आणि बॉन्साय प्रकारातील अनेक झाडंही मांडण्यात आली आहेत.
सिमेंट काँक्रिटच्या जंगलामुळे मुलं- पालकांना गुलाबाची झाडं लावायला जागाही मिळत नाही. आणि त्यांची माहितीही मिळत नाहीये. ही माहिती होण्यासह वेगवेगळया प्रकारचे गुलाब पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची प्रतिक्रीया कल्याण रोझ क्लबच्या अध्यक्षा संतोष चितलांगे यांनी यावेळी दिली.