कल्याणात माणुसकीसाठी धावून आली माणुसकी
कल्याण दि.15 ऑक्टोबर :
समाजात हल्ली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असताना माणुसकीसाठी माणुसकी धावून आली आहे. नदीमध्ये बुडणाऱ्या मुलांना वाचवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पांढऱ्या वेशातील देवदूतांनी पुढाकार घेतल्याचा कौतुकास्पद प्रकार कल्याणात घडला.(Angels initiative to save lives, of the guardian saving the drowning children in the river)
काळजाचा ठोका चुकवणारी घटना…
कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ गावाजवळ असलेल्या उल्हास नदीमध्ये काल सकाळी काही मुलं पोहण्यासाठी उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण गटांगळ्या खाऊ लागली. त्यावेळी नदीकिनारी असणाऱ्या अनिल राक्षे या ग्रामस्थाला ही गटांगळ्या खाणारी मुले दिसली. आणि त्याने क्षणाचाही विचार न करता थेट नदीमध्ये उडी घेत या बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढले. मात्र या मुलांचा जीव वाचत वाचवताना अनिल नदीमध्ये असणाऱ्या गाळात जाऊन रुतला आणि नाका तोंडात पाणी गेल्याने तिकडेच तो बेशुद्ध झाला. दरम्यान त्याची पत्नी ही नदी शेजारीच कपडे धुवत होती. तिने हा सर्व प्रकार पाहिला आणि आरडाओरडा करून काही लोकांना मदतीने नदीमध्ये बेशुद्ध झालेल्या अनिलला बाहेर काढले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका चालकाने मागचा पुढचा विचार न करता आणि कोणताही मोबदला न घेता अनिलला कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील जी प्लस हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले.
आणि माणुसकीसाठी धावली माणुसकी…
एकंदर परिस्थितीचे गांभिर्य या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता आणि कागदपत्रांमध्ये वेळ न वाया घालवता अनिलला रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. अनिलच्या शरीरामध्ये तसेच मेंदूपर्यंत नदीचे पाणी गेले होते. या रुग्णालयाचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि निलेश उपाध्याय यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ करत अनिलच्या शरीरातून सर्व पाणी बाहेर काढत अनिलला नवीन जीवनदान दिले. शरीरातून पाणी बाहेर काढल्यानंतरही अनिल तब्बल 26 तास बेशुद्ध अवस्थेत होता. मात्र आज सकाळी अनिलला शुद्ध आली आणि त्याच्या कुटुंबीयांसह जी प्लस हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल चव्हाण आणि डॉ.निलेश उपाध्याय यांनी सुटकेचा विश्वास सोडला.
जी प्लस हार्ट हॉस्पिटल डॉक्टर अमोल चव्हाण आणि डॉक्टर निलेश उपाध्याय यांच्या प्रयत्नांमुळेच माझा भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत येऊ शकला अशी प्रतिक्रिया अनिलच्या भावाने व्यक्त केली. तसेच आमची आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णालयानेही नाममात्र दरात अनिल वर उपचार केल्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे मनापासून आभार मानले.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बोलणाऱ्या मुलांना वाचवणारा अनिल असो की अनिलला रुग्णालयात घेऊन येणारा तो रुग्णवाहिका चालक असो. की अनिलचा जीव वाचवणारे ते डॉक्टर असो. या सर्व घटनेतून माणुसकीसाठी माणुसकी धावून आल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे.