Home ठळक बातम्या नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलनाची हाक

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलनाची हाक

 

डोंबिवली दि.7 जून :
नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी भूमीपुत्रांकडून ‘मानवी साखळी आंदोलना’ची हाक दिली आहे. येत्या गुरुवारी 10 जून रोजी कल्याण शिळ, कल्याण मलंगगड आणि मुंब्रा पनवेल मार्गावर ही मानवी साखळी होणार असल्याची माहिती सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीतर्फे देण्यात आली. प्रस्तावित आंदोलनाची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना वगळता इतर सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

नवी मुंबईत सिडकोच्या जमिन संपादनानंतर भूमिहीन झालेल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी दि.बा. पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा उभारला. आणि त्याद्वारे भूमीपुत्रांना साडेबारा टक्के जमीन परत मिळवून दिली. त्याचबरोबर 27 गावांचा प्रश्न, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मिठागर कामगार अशा सर्वानाच त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. यासाठी नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची एकमुखी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

त्यासाठीच येत्या 10 जुन रोजी सकाळी 10 वाजल्यापासून (कल्याण शिळ मार्गावर) पिसवली ते शिळफाटा, (कल्याण मलंगगड मार्गावर) नेवाळी चौक ते तिसगाव चक्की नाका आणि (मुंब्रा -पनवेल मार्गावर) दहिसर ते शिळफाट्यापर्यंत ही मानवी साखळी उभी करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे यांनी दिली. शासनाला इशारा देण्यासाठी आम्ही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामध्ये वारकरी संप्रदायही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी याचे होर्डींगही झळकत आहेत.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, गंगाराम शेलार, संतोष केणे, अर्जुन चौधरी, गजानन मंगरुळकर, दत्ता वझे, भास्कर पाटील आणि नंदू म्हात्रे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा