Home ठळक बातम्या विद्यापीठ सुधारणा कायद्यातील बदलांविरोधात भाजप युवा मोर्चाचे डोंबिवलीत आंदोलन

विद्यापीठ सुधारणा कायद्यातील बदलांविरोधात भाजप युवा मोर्चाचे डोंबिवलीत आंदोलन

 

डोंबिवली दि.31 डिसेंबर :

महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या मनमर्जीने अधिवेशनात चर्चा न करताच विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्याचे सांगत त्याविरोधात कल्याण जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे डोंबिवलीत निदर्शने करण्यात आली. यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यासह आघाडी सरकारच्या मनमानीविरोधात फलक दाखवत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.

2017 मध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ह्या दोन्ही सभागृहात बहुमताने पारित झालेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने दडपशाहीने दुरुस्ती आणली, आणि शिक्षणमंत्र्यांना उप कुलगुरू म्हणून मान्यता देऊन, शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप यावेळी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आला. तसेच विद्यापीठ नियुक्ती, विद्यापीठाच्या खरेदी, परीक्षा विभाग, अभ्यासक्रम ह्या सर्वात आता राजकीय हस्तक्षेप होणार असून शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी विरोध करून नाराजी प्रकट केल्याचे मिहिर देसाई यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या या दडपशाहीविरोधात भाजप उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगत प्रत्येक विद्यापीठ आणि जिल्हा याचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली.

या आंदोलनात भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रदीप चौधरी, युवामोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सकपाळ, सौरभ सिंह, सचिव स्वानंद भणगे, चिंतन देढिया, अमोल साळुंके आणि युवा मोर्चा जिल्हा आणि मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा