Home Uncategorised ‘बर्ड फ्ल्यू’च्या भितीने चिकन विक्री आली 30 टक्क्यांवर; दरांमध्ये झाली मोठी घसरण

‘बर्ड फ्ल्यू’च्या भितीने चिकन विक्री आली 30 टक्क्यांवर; दरांमध्ये झाली मोठी घसरण

 

कल्याण दि.11 जानेवारी :
काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेते अद्याप सावरलेही नसताना आता ‘बर्ड फ्ल्यू’ने त्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. परभणीपाठोपाठ ठाण्यातही ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याचे समोर आल्याने जिवंत कोंबडी आणि चिकनच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या कालावधीत या व्यवसायावर झालेल्या या आघातांमुळे रोजगार आणि उत्पन्नाचा मोठा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना आला आणि एकच अफवा उठली. की चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. मग काय.. आपल्या लोकांनी चिकन आणि कोंबड्यांवर असा काही बहिष्कार घातला की फुकटात कोंबड्या आणि चिकन वाटुनही कोणी घ्यायला तयार होत नव्हते. त्यातच लॉकडाऊन लागले आणि पोल्ट्री आणि चिकन व्यावसायिकांची आगीतून फुफाट्यात अशी गत झाली. मात्र जून, जुलैनंतर मिशन बिगीन आगेनमध्ये पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने आणि लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे चिकन व्यावसायिक काहीसे आनंदात होते. कोरोनानंतर आता कुठे व्यवसाय स्थिर स्थावर होत असतानाच ‘बर्ड फ्ल्यू’ आला आणि पोल्ट्री आणि चिकन व्यावसायिक पुन्हा एकदा दुर्दैवाच्या खाईत लोटले गेले आहेत.

अवघ्या 2-3 दिवसांत रोजची होणारी कोंबडी आणि चिकनची विक्री आणि त्यांना येणारी किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 टक्क्यांनी पडली. येत्या काही दिवसांत उरली सुरली ही विक्री आणि उत्पन्न पुनः एकदा पूर्णपणे ठप्प होईल या चिंतेने हे व्यावसायिक व्यथित झाले आहेत. कोरोनानंतर कसे बसे उसने अवसान आणून नव्याने व्यवसाय सुरू केला होता. मात्र आता या धक्क्यातून सावरणे केवळ अशक्य असल्याची भिती, कल्याणात 3 पिढ्यांपासून चिकनचा व्यवसाय करणाऱ्या जावेद मोमीन यांनी लोकल न्यूज नेटवर्कशी(LNN) व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा