Home Uncategorised मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पलावावासियांना दिवाळी भेट; मालमत्ता करात ६६ टक्के सुट देण्याचा राज्य...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पलावावासियांना दिवाळी भेट; मालमत्ता करात ६६ टक्के सुट देण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

मुंबई दि. 30 ऑक्टोबर :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पलावा वसाहतीतील रहिवाशांना करात ६६ टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तब्बल 26 हजार सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली आहे. (Diwali gift from Chief Minister Eknath Shinde to Palawan residents; State government’s decision to give 66 percent property tax exemption)

या कारणासाठी पलावावासीयांना मालमत्ता करामध्ये मिळाली सूट…
मौजे निळजे, काटई, घेसर, उसरघर, माणगांव आणि हेदूटणे या मनपा हद्दित मे. लोढा डेव्हलपर्स यांनी पलावा येथे एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प (Integrated Township Project) करण्यास नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) वेळोवेळी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि पूर्ण झालेल्या इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांतर्गत सर्व पायाभुत सुविधा जसे रस्ते, अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्था, जलनिःसारण, मलनिःसारण व्यवस्था विकासकामार्फत विकसित केले जाते. यात अग्निशमन व्यवस्था, शाळा आणि पोलीस चौकी यांचाही समावेश असतो. या प्रकल्पाांअंतर्गत सर्व पायाभुत सुविधा आणि इतर सोयी सुविधा विकासकामार्फत उपलब्ध करून दिल्या असल्याने याचा कोणताही भार महापालिकेवर पडत नाही. असे असूनही महानगरपालिकेकडून अशा इमारतीतील सदनिकाधारकाकडून संपूर्ण मालमत्ता कराची मागणी केली जात होती.

या निर्णयामुळे ४ हजार रूपयांची मिळणार कर सवलत…
महानगरपालिका या गृहसंकुलातील सदनिकाधारकांकडून प्रतीवर्ष प्रती सदनिका अंदाजे ६ हजार रूपये मालमत्ता कराची मागणी करत असून शासन अधिसूचनेनुसार कर सवलतीची अंमलबजावणी महानगरपालिकेकडून केल्यास प्रती वर्ष प्रती सदनिका अंदाजे ४ हजार रूपयांची कर सवलत सदनिकाधारकास मिळणार आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी सातत्याने याबाबत दिलासा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सकारात्मक भूमिका घेत ६६ टक्के कर सवलतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यापुढे आता पलावा येथील वसाहतीला केडीएमसीच्या मालमत्ता करात तब्बल ६६ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तर या निर्णयाचा लाभ तब्बल २६ हजार कुटुंबांना मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल पलावा वासियांनी मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे पलावावासियांची दिवाळी गोड झाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

२७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्याबाबतही सूचना…
या बैठकीत २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने आणि कायमस्वरुपी सोडविण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सूचना दिल्या. याअंतर्गत नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून अधिक दाबाने मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, अधिकचे बूस्टर पंप बसविणे, नळजोडण्यांचा व्यास दुप्पट करणे यांसारख्या उपाययोजना राबविण्याच्या तसेच पाणी वितरण व्यवस्था उभारण्यासाठी सविस्तर नियोजन आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराच्या जागेचेही लवकरच हस्तांतरण…
पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराची सुमारे ६ एकर जागा एमआयडीसी प्राधिकरणाच्या नावे आहे. ही जागा मंदिर देवस्थानाच्या नावे करण्यात यावी अशी स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे. या मागणीबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा घडून आली. तर, ही जागा लवकरच हस्तांतर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा