Home ठळक बातम्या कल्याणच्या डम्पिंगला आगीची तर उंबर्ली टेकडीवर वणव्याची झळ ; आगीचे कारण मात्र...

कल्याणच्या डम्पिंगला आगीची तर उंबर्ली टेकडीवर वणव्याची झळ ; आगीचे कारण मात्र अस्पष्ट

 

कल्याण – डोंबिवली दि.13 मार्च :
दोन विविध ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांनी कालची रात्र झाकोळून गेलेली पाहायला मिळाली. एकीकडे कल्याणच्या वाडेघर डम्पिंगवरील कचऱ्याला काल रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. तर कल्याण ग्रामीण भागातील उंबर्ली टेकडीवर मोठा वणवा लागल्याचे दिसून आले.

काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वाडेघर डम्पिंगवरील कचऱ्याला मोठी आग लागल्याचे समोर आले. ही आग इतकी मोठी होती की आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण केले. तर आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. तर आज सकाळीही याठिकाणी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून एलएनएनला देण्यात आली.

दरम्यान काही वर्षांपूर्वी कल्याणमधील डम्पिंग ग्राउंड हे कचऱ्याच्या प्रश्नासाह सततच्या आगीच्या घटनांमुळे चांगलेच कुप्रसिद्ध झाले होते. मात्र प्रशासनाने गेल्या दोन अडीच वर्षांत महत्प्रयासाने शहरातील कचऱ्यासोबतच इथल्या आगीच्या प्रश्नावरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री लागलेली आग ही लागली की लावली गेली याबाबत केडीएमसी प्रशासनाकडूनही संशय व्यक्त केला जात आहे.

तर इको सेन्सिटिव्ह झोन अशी ओळख असणाऱ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उंबर्ली टेकडीवरही रात्री वणवा लागलेला पाहायला मिळाला. विविध वनश्रीने नटलेली ही टेकडी डोंबिवलीचे फुफ्फुस समजली जाते. काही वर्षांपूर्वी याठिकाणीही काही समाज कंटकांनी झाडांना आग लावल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर काल रात्री लागलेला वणवा हा नैसर्गिक होता की कोणी तरी मुद्दामहून याठिकाणी आग लावली असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान स्थानिक रहिवासी आणि निसर्गप्रेमींना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग नियंत्रणात येऊ शकली.

कल्याण डम्पिंग ग्राउंड आग फोटो सौजन्य :- रोहीत बिडगर, एलएनएन सिटीजन रिपोर्टर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा