Home ठळक बातम्या अनुबंध संस्थेतर्फे कल्याणातील सफाई कामगारांचा गौरव

अनुबंध संस्थेतर्फे कल्याणातील सफाई कामगारांचा गौरव

 

कल्याण दि.5 ऑक्टोबर :
नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीचे औचित्य साधत “अनुबंध” संस्थेच्या माध्यमातून समाजातील अंतिम घटक म्हणून सार्वजनिक स्वच्छ्तागृह साफ करणाऱ्या आणि गटारीत उतरून काम करणाऱ्या सफाई कामगारांचा आज सन्मान करण्यात आला.

श्रमिक कामगार युनियनचे पदाधिकारी जगदीश खैरालिया, राष्ट्र सेवा दलाचे सुहास कोते, प्रा.मीनल सोहनी, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

स्वातंत्र्यानंतरही कामगार वर्गाचे होणारे शोषण आणि उपेक्षा होत आहे. समाजाच्या वाटचालीसाठी समाजातील सफाई कामगारांचे योगदान अतिशय मोलाचे असल्याचे मत जगदीश खैरलिया यांनी व्यक्त केले. तसेच सफाई कामगारांच्या मुलांनी शिक्षण घेऊन इतर कामाकडेही वळले पाहिजे, उद्योगधंदे केले पाहिजेत असेही सांगितले.

तर वर्गभेदाच्या, जातीभेदाच्या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांच्या योगदानाची उचित नोंद घेतली जात नाही असा घटक म्हणजे सफाई कामगार असल्याचे मत अनुबंध संस्थेच्या प्रा.मीनल सोहोनी यांनी मांडले. सफाई कामगारांचे कष्ट, जातवास्तव, कामाची जागा, परिस्थिती, उपलब्ध साधने आणि समाजाची तुच्छता या वास्तवाला बदलण्याची गरज असून या परिवर्तनाच्या लढाईत अनुबंध संस्था सोबत असल्याचे विशाल जाधव यांनी सांगितले.

या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने ४० सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला असून संस्थेचे सुर्यकांत कोळी, प्रभाकर घुले, राहुल साबळे, प्रीती ढगे तर महापालिका अधिकारी संजय धात्रक, अविनाश मांजरेकर, दिपेश कराळे यांच्यासह इतर सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा