Home ठळक बातम्या वाढीव रकमेचा दिवाळी बोनस ; महापालिका कर्मचाऱ्यांनी मानले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे...

वाढीव रकमेचा दिवाळी बोनस ; महापालिका कर्मचाऱ्यांनी मानले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार

कल्याण डोंबिवली दि. 7 नोव्हेंबर:

कल्याण – डोंबिवली महापालिकेतर्फे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला यंदा १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अर्थातच बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर उल्हासनगर महापालिकेच्या २१०० कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक उत्साहात आणि आनंदात जावी यासाठी गेल्या वर्षाहुन  अधिक रकमेचा बोनस जाहीर करून त्यांना ती रक्कम लवकर देण्याची सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका प्रशासनाला  दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेनेही तातडीने कार्यवाही करत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला वाढीव रकमेचे दिवाळी बोनस जाहीर केले आहे. यामुळे सर्व महापालिका कमर्चाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

दिवाळी म्हणजे उत्साहाचा आणि आनंदचा उत्सव. राज्यातील सर्व नागरिकांची तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदाची व्हावी यासाठी राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही लवकर आणि काही वाढीव रकमेचा दिवाळी बोनस देण्यात यावा. तसेच महापालिका प्रशासनाने बोनसची रक्कम काही दिवस आधीच सुपूर्द केल्यास सर्व कर्मचारी बंधू – भगिनींना आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत दिवाळी उत्सवाची मोठ्या आनंदात पूर्वतयारी करता येईल आणि त्यांची दिवाळी अधिक गोड होईल. अशा सूचना कल्याण खासदार डॉ.शिंदे यांनी उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकेच्या वतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस घोषित करण्यात आला आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रशासनाचे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये इतका दिवाळी बोनस देण्यात आला होता. या वर्षी त्यात वाढ करून १८ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वर्ग ३-४ च्या कर्मचाऱ्यांबरोबरच वर्ग १ व २ च्या अधिकारी वर्गासही वाढीव रकमेचा बोनस देण्यात येणार आहे. तर उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १५ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता. यावर्षी १६ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला आहे. यामुळे यंदा अधिक रकमेचा बोनस मिळाल्याने उल्हासनगर महापालिकेतील २१०० कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा