डोंबिवलीतील बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाला उपस्थिती
डोंबिवली दि.२८ जानेवारी :
स्वामी विवेकानंद यांनी भारत हा विश्वगुरु होणार हे सांगितले आहे. आत्ताची आपल्या देशाची प्रगती याच पथावर आहे. आंतराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ठामपणे निर्णय घेतले जात असल्याने भारताबद्दल आदराची दृष्टी निर्माण झाली असल्याचे गौरवउद्गार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले. (India’s role in international politics is becoming important – Former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan)
नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा प्रवास उलगडला…
डोंबिवली येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात आठ वेळा इंदौरच्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची मुलाखत पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा सुमित्राताईंचा प्रवास उलगडला. तर साध्या रहाणीच्या सुमित्राताईंनी उपस्थितांची मने जिंकली.
राजकारण, समाजकारण, वाचन संस्कृतीबाबतची मते…
पै फ्रेण्डस लायब्ररीच्या पुढाकारानं आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डोबिंवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्यानं आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या आठव्या दिवशी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या भेटीचा अभूतपूर्व योग जुळून आला. आठ वेळा इंदौरच्या खासदार राहिलेल्या आणि चिपळूणच्या सुकन्या असलेल्या सुमित्रा महाजन यांची मुलाखत पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली. यावेळी सुमित्राताईंनी राजकारण, समाजकारण आणि वाचन संस्कृती याबाबत आपली मते उपस्थितांसमोर व्यक्त केली.
संस्कृत भाषेचा असा झाला फायदा…
सुमित्राताईंनी लहानपणापासूनचा आपला प्रवास सांगितला. राजेंद्र हुंजे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत त्यांनी वाचन संस्कृती किती महत्त्वाची आहे, हे सांगितले. आता ३ हजारावर पुस्तकांचा संग्रह असलेल्या सुमित्राताई म्हणाल्या, माझ्यावर लहानपणापासून वाचनाचे संस्कार होते. संस्कृत भाषा शिकता आली. ज्याला संस्कृत येते, त्याला कोणतीही भाषा अवघड वाटत नाही. त्यामुळेच लोकसभेचे अध्यक्षपद भुषवतांना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधतांना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले.
निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल तर…
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलतांना सुमित्राताई महाजन म्हणाल्या की, देशाची प्रगती करण्याची जबाबदारी फक्त राजकीय नेत्यांची असते असे नाही. जनतेचीही जबाबदारी असते, जर आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल, त्याचे बोलणे आपल्याला आवडत नसेल, तर मतदारांनी नेत्याला त्याची जाणीव करुन दिली पाहिजे. आजकल देवालाही वाटून घेतलं जातं, तसंच मोठ्या माणसांनाही वाटून घेतलं जात आहे. हा चुकीचा पायंडा असल्याचे महाजन यांनी सांगितले.
राजकारणात महिला म्हणून कर्तुत्व अधिक सिद्ध करावं लागतं…
इंदौरमध्ये होत असलेल्या अहिल्याबाई स्मारकाची माहिती देतांना सुमित्रा महाजन यांनी ज्याचा हाती सत्ता आहे, त्याच्याकडे समर्पणाचा भाव असावा असे सांगितले. अनुभव आणि युवा शक्ती यांचा मिलाप होणे गरजेचे आहे. लोकसभेतील कामकाजाचा अनुभव सांगतांना त्यांनी आज कालच्या राजकारणात स्थैर्य येण्याची गरज असल्याचे सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशा प्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव सुमित्रा महाजन यांनी उपस्थितांना सांगितला. नगरसेवक ते लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगताना महिला म्हणून कतृत्व अधिक सिद्ध करावं लागतं हे सांगितलं.
यावेळी सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपलपदाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी अत्यंत मिश्किल भाषेत उत्तर दिले. या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांचा सत्कार पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे पुंडलिक पै यांनी केला. सुमित्रा महाजन यांचे चित्र आणि मानपत्रही त्यांना देण्यात आले. चित्रकार प्रभू कापसे यांनी काढलेले चित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेले मानपत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते महाजन यांना देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माधव जोशी, दर्शना सामंत, मधुकर चक्रदेव, पुराणिक, दिपाली काळे, वृंदा भुस्कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनिकेत घमंडी यांनी केले.