Home ठळक बातम्या देवगंधर्व महोत्सवातील सप्तसुरांत न्हाऊन निघाले कल्याणकर

देवगंधर्व महोत्सवातील सप्तसुरांत न्हाऊन निघाले कल्याणकर

 

कल्याण दि.12 डिसेंबर :
कल्याण गायन समाजातर्फे आयोजित देवगंधर्व महोत्सव. कल्याण नगरीच्या सांस्कृतिक शिरपेचातील मानाचा तुरा समजला जाणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे 20 वे वर्ष. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवातील सप्तसुरांमध्ये रसिक-श्रोते आनंदाने न्हाऊन निघालेले पाहायला मिळाले.

देशपातळीवर शास्त्रीय संगीत क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कल्याण गायन समाजातर्फे गेली 2 दशके अविरतपणे हा संगीतयज्ञ सुरू आहे. ज्यामध्ये संगीत क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या अनेक दिग्गजांनी आपली कला सादर केली असून देशभरात होणाऱ्या मोजक्या संगीत महोत्सवात कल्याण गायन समाजाच्या या देवगंधर्व महोत्सवाला मानाचे स्थान आहे.

शनिवार 11 आणि रविवार 12 डिसेंबर असे दोन दिवस झालेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी यशस्वी सरपोतदार, ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय गायन आणि अनुब्रत चॅटर्जी यांचे एकल तबलवादन सादर करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात भक्ती नाट्य वंदना कार्यक्रमांतर्गत ‘सुरा मी वंदिले’ या कार्यक्रमात नाट्य आणि भक्तीगीतांचा अप्रतिम असा मिलाप पाहायला मिळाला. ज्यामध्ये पंडीत चंद्रशेखर वझे, मनिषा घारपुरे, मेघना देसाई आणि कौस्तुभ आपटे यांनी सादर केलेल्या सुरेल गायनाला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तसेच आपल्या गायन कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल पंडीत चंद्रशेखर वझे यांचा यावेळी आयोजकांतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

 

तर कोरोनामुळे गेले 2 वर्षांपासून कलाकार आणि श्रोते दोघेही घरी बसले होते. या कलाकारांची सादर करण्याची आणि रसिक श्रोत्यांची ऐकण्याची जी भूक होती ती विचारात घेऊन एक सकारात्मकता पसरवण्यासाठी हा महोत्सव आयोजित केल्याची माहिती कल्याण गायन समाजाचे प्रशांत दांडेकर यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा