Home ठळक बातम्या वायू प्रदूषणाचा मुद्द्यावर केडीएमसी आक्रमक; मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा

वायू प्रदूषणाचा मुद्द्यावर केडीएमसी आक्रमक; मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा

फटाके फोडण्याच्या वेळेसह बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमावली जाहीर 

कल्याण डोंबिवली दि.9 नोव्हेंबर :
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावली असून हायकोर्टाने कान पिळल्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आणि वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी फटाके फोडण्याची वेळ निर्धारित करण्यासह बांधकाम क्षेत्रासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे. (KDMC aggressive on the issue of air pollution; Warning of action if guidelines are not followed)

धुळ प्रतिबंधक उपाययोजना तात्काळ अंमलात आणणेबाबत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत उपस्थितांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व इतर अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी,आरटीओ अधिकारी, एमसीएचआयचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धूळ नियंत्रणासाठी प्रभागनिहाय पथकाची स्थापना…
महापालिकेने सर्व प्रभागांतर्गत धुळ नियंत्रण उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रभागनिहाय पथकाची स्थापना केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत दिली. या पथकामध्ये बांधकाम विभागाचे उपअभियंता पथकप्रमुख राहणार असून, त्यामध्ये अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिक्षक, स्वच्छता अधिकारी आणि संबंधित‍ विभागाकरीता नियुक्त असलेले नगररचना विभागाचे सर्व्हेअर यांचा अंतर्भाव असणार आहे.

असे काम करणार हे पथक…
हे अंमलबजावणी पथक संबंधित परिसराला भेट देवून व्हिडीओग्राफी करेल. त्याठिकाणी नियमातील तरतुदींचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास हे काम थांबविण्याची नोटीस देईल. किंवा हे कार्यस्थळ तात्काळ सील करण्याची कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत.

बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमावली जाहीर…

तसेच 70 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान 35 फुट उंच कथील/धातूचे पत्रे उभारले जातील,
बांधकामाधीन सर्व इमारतींना हिरव्या कापडाने/ज्युट शीटने/ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे.
बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग करणे,
सर्व बांधकाम ठिकाणी C & D (बांधकाम आणि पाडणे) कचरा महापालिकेच्या सी आणि डी कचरा व्यवस्थापन योजनेनूसार निर्धारित ठिकाणी वाहून नेण्याची व्यवस्था करावी.
राडारोडा उतरवल्यावर वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ करावे,
सर्व बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायु प्रदुषण मॉनिटर्स बसवावेत.
हे मॉनिटर्स महापालिका अधिका-यांना आणि मागणीनुसार तपासणीसाठी उपलब्ध करुन दिले जावेत,
सर्व बांधकामाच्या ठिकाणी वायूप्रदुषण पातळी नियंत्रीत राखण्यासाठी प्रयत्न करावेत,

केवळ या वेळेतच फोडा फटाके…
त्यासोबतच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हवेतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रात संध्याकाळी 7 ते रात्री 10 ही वेळच फटाके फोडण्यासाठी निर्धारित राहील
अशी माहितीही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे त्यांनी यावेळी दिली.

उघड्यावर कचरा जाळला तर 5 हजारांचा दंड…
महापालिका क्षेत्रात विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड किंवा उघड्यावर कोठेही कचरा जाळण्यास पूर्ण बंदी असेल. या बंदीचे उल्लंघन केल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपू्र्ण जबाबदारी ही संबंधित प्रभागाचे सहा. आयुक्त यांची राहणार असून, त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांची मदत घेवून धुळ प्रतिबंधक उपाययोजना परिणामकारकरित्या राबवावी. आणि केलेल्या कारवाईचा अहवाल उपायुक्त पर्यावरण, कार्यकारी अभियंता पर्यावरण यांच्याकडे सादर करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.

दरम्यान एकीकडे शहरातील नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी केडीएमसी प्रशासनाने नियम आणि दंडाचा इशारा दिला आहे. मात्र दिवाळी आली तरी अद्यापही रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना होणाऱ्या आजाराला जबाबदार अधिकारी – ठेकेदारांवर काय कारवाई करणार असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा