Home ठळक बातम्या केडीएमसीच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय स्तरावरील ग्रीन एनर्जी संवर्धन पुरस्कार प्रदान

केडीएमसीच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय स्तरावरील ग्रीन एनर्जी संवर्धन पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली दि.16 फेब्रुवारी :
सौर उर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा ग्रीन ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळाला आहे. इंडिया हॅबिटाट सेंटर, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या १२व्या ग्रीन एनर्जी समीटमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ४था ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देवून सन्मानित केले.

कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी स्विकारला पुरस्कार…
देशस्तरावर सौर उर्जा क्षेत्रात आणि महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेवून संपूर्ण देशातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवड करण्यात आली. महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत रा. भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.

दरवर्षी ३० लाख युनिट वीजनिर्मिती…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सन २००७ पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतीवर सौरऊर्जा संयंत्रे बसवणे बंधनकारक केले आहे. त्याकामी महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे. सन २००७ ते २०२१ या कालावधीत एकूण 1 हजार 832 इमारतींवर १ कोटी ८ लाख लिटर्स प्रतीदिन क्षमतेचे सौरोष्ण जल संयंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे इमारतींमध्ये गिझरचा वापर न होता प्रती वर्ष १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे. तर २०२१ पासून महानगरपालिकेने नव्या इमारतींवर रुफटॉप नेटमीटर सौर उर्जा निर्मिती प्रकल्प बसवणे बंधनकारक केले असून आजपर्यंत ११९ इमारतीवर २ हजार ८३ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाल्याने दरवर्षी ३० लाख युनिट वीजनिर्मिती होत आहे.

महिना अखेरीस विविध प्रकल्प होणार कार्यान्वित…
महानगरपालिकेने आधारवाडी येथील नविन प्रशासकीय इमारतीवर २५ किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच प्रभागक्षेत्र कार्यालय आणि आयुक्त निवासस्थान यासह १० इमारतींवर १६० किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप नेट मीटर सेंटर ऊर्जा निर्मिती प्रकल्पही या महिना अखेरीस कार्यान्वित होत आहेत.

सोडीयम दिव्यांच्या जागी उर्जा बचत करणारे एलईडी…
ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर असणारे जूने परंपरागत सोडीयम दिवे काढून त्याजागी उर्जा बचत करणारे एलईडी दिवे बसविले आहेत. ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात परंपरागत चिलर काढून ऊर्जा कार्यक्षम व ऊर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयामध्ये उर्जा बचत करणारे २८ वॅट क्षमतेचे सिलींग फॅन आणि एलईडी लाईटस बसवले आहेत. महापालिकेने उंबर्डे, आयरे, कचोरे येथे प्रत्येकी १० मेट्रीक टन क्षमतेचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित केले असून कच-या पासूनही वीज निर्मिती होत आहे. आधारवाडी येथे २ टन क्षमतेचे बायोमास प्रकल्प कार्यान्वित असून स्लॉटर हाऊसमधील वेस्टपासून वीज निर्मिती होत आहे.

ऊर्जा संवर्धनाबाबत मोठी जनजागृती…
ऊर्जा संवर्धन आणि सौर ऊर्जा वापराबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक, नागरीक,वेगवेगळया महोत्सव, मोठ्या रहिवासी सोसायटी येथे पथनाट्य आणि उर्जा संवर्धन गीताच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा