Home ठळक बातम्या कल्याणात साजरा होणार ‘लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा’

कल्याणात साजरा होणार ‘लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा’

 

कल्याण दि.12 ऑगस्ट :

लोककवी वामनदादा कर्डक. एक असे व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या कविता, गझल आणि गीतांतून समता-बंधुता-न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार खेडोपाडी पोहचविले. त्यांनी समाजपरिवर्तन लढ्यासाठी आपली लेखणी तहहयात झिजवली. गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाच्या केवळ व्यथा आणि कथाच मांडल्या नाहीत तर समता-बंधुता-सामाजिक न्याय टिकून राहावा याकरिता देखील तळमळीने लेखन केले. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे यजमानपद कल्याण शहराला मिळाले आहे.

गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे. पु ल देशपांडे यांच्या स्मृती कल्याण नगरीत जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ह्या मंचाने आजवर अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविले असून त्यांच्यामार्फत हा वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे.

पु.ल. देशपांडे आणि वामनदादा कर्डक तशी समकालीन व्यक्तिमत्वे. पु. ल. देशपांडे आपल्या चतुरस्त्र प्रतिभेने मराठी घराघरात आणि मनामनात अधिराज्य करीत होते. त्याचवेळेस वामनदादाही आपल्या लेखणीने महाराष्ट्राच्या खेडोपाडी, वाडीवस्ती, झोपडपट्टी आणि शहरात सर्वदूर पोहोचले होते. त्यांची अनेक गाणी ही केवळ गाणी राहिली नाहीत तर ती समाज परिवर्तनाच्या लढ्याचे स्फूर्तीगीतं बनली. अनेकदा कार्यक्रमानिमित्त वामनदादा अनेक वेळा कल्याण नगरीत येत असत, वास्तव्य करीत आणि आपल्या लेखणीने अनेकांना प्रेरणा देत असत.

अशा या लोककवीला मानवंदना म्हणून पु.ल.कट्ट्यातर्फे हा जन्मशताब्दी हा सोहळा साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यामध्ये कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी तर प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे. या जन्मशताब्दी सोहळ्यात वामनदादा कर्डक यांचे साहित्य आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

येत्या शनिवारी १४ ऑगस्ट २०२१ रोजी, या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार असून कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर जे.जे स्कुल ऑफ आर्ट्सचे गणेश तरतरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वामनदादा यांचे गाव देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

या उदघाटन सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्यात अरुण म्हात्रे, माधव डोळे, प्रशांत वैद्य, रमेश अव्हाड, किरण येले, प्रशांत मोरे, संदेश ढगे, वृषाली विनायक आणि आकाश पवार सहभागी होणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा