Home ठळक बातम्या रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएने डीपीआर बनवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएने डीपीआर बनवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कल्याणातील विविध विकासकामांचे लोकार्पण

कल्याण दि.12 फेब्रुवारी :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एम.एम.आर.डी.ए. ला डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.(MMRDA should make DPR keeping in mind the requirement of Ring Road – Chief Minister Eknath Shinde’s instructions)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ऑनलाईन भूमीपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कै.दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ, पात्र प्रकल्पबाधितांना बीएसयूपी सदनिका वितरण, अग्निशमन केंद्र मुख्यालय आधारवाडी आणि प्रभाग क्षेत्र कार्यालय, अमृत २.० अंतर्गत गौरीपाडा येथे ९५ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. त्याचबरोबर सिटी पार्क आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत प्राप्त ई-बसेसचेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आज कल्याण डोंबिवलीच्या जनतेसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होत आहे. कल्याण डोंबिवली शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे. कल्याण शहराला मोठा इतिहास आहे. कल्याण पश्चिममध्ये उल्हासनगर सारखे हॉस्पिटल उभे करावे, सिटी पार्क उभे राहिले आहे, यामुळे नागरिकांना विरंगुळयासाठी एक उत्तम साधन मिळाले आहे. शहरासाठी आवश्यक चांगल्या पर्यावरणाकरिता नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत. मुंबईप्रमाणेच कल्याण-डोंबिवली मध्येही डीप क्लिनिंग अभियान सुरू करावे, यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल.हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, लोकांसाठी ज्या सुविधा द्यायच्या त्या प्रमाणिकपणे दिल्या पाहिजेत. कल्याण- डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक लागेल तेवढा निधी पुरविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

सिटी पार्कसारखी उद्याने शहराची फुफ्फुसे…
सिटी पार्कसारखी उद्याने ही ऑक्सिजन पार्क ठरत आहेत. ही अशी उद्याने शहराची फुफ्फुसे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात तब्बल 25 एकर जागेवर हा अतिशय भव्य असा सिटीपार्क प्रकल्प साकारण्यात आला आहे. यामध्ये 1000 मी. लांब आणि 4 मी रुंद जॉगिंग ट्रॅक आणि पाथवे, बहुउद्देशिय लॉन, सुशोभित तलाव आणि गॅलरी स्टेप सिटींग, प्रदर्शन केंद्र, ॲम्फी  थिएटर, लहान मुलांसाठी मनोरंजन मैदान, फुड प्लाझा, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्मार्ट शहराची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे याचा विशेष अभिमान आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह भिवंडी आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या मदतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. आज ज्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले,त्यांचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रिंगरोड हवा…
तर कल्याण डोंबिवली शहर खूप वाढत आहे. याचा अफाट आवाका आणि विस्तार पाहता तिसरी मुंबई आपल्याकडेच निर्माण होणार असल्याने नवी मुंबई एअरपोर्ट, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहारांद्वारे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रिंगरोड झाल्यास लोकांना इकडून बाहेर पडण्यासाठी खूप सोयीचे होईल अशी मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.या तिसऱ्या मुंबईच्या वाहतूक कोंडीचा आताचा आणि भविष्यातील प्रश्न या रिंग रोडमुळे सुटू शकेल. आणि हैद्राबाद आणि अहमदाबाद शहरांप्रमाणे याठिकाणी एक्सेस कंट्रोल सुविधा मिळू शकेल असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखड आदि मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा